खुशखबर ! पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीनंतर सलग आठ दिवस इंधनांच्या दरांनी उचल घेतल्यानंतर आता पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी होत आहेत. आजदेखील इंधनाचे दर कमी झाले आहेत. पेट्रोलचे दर प्रतिलिटर १६ पैशांनी तर, डिझेलचे दर प्रतिलिटर १५ पैशांनी कमी करण्यात आले. यानंतर आता मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ७६.२५ व दिल्लीत ७०. ५६ तर डिझेलचे भाव अनुक्रमे ६७.६३ व ६४.५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या बदलामुळे भारतातील इंधनाचे दर कमी झाले आहेत. ब्रेण्ट क्रूड ऑइलचे दर प्रतिबॅरल ६२ अमेरिकी डॉलरपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे ३० मे पासून दररोज इंधनाचे दर घसरताना दिसून येत आहे. त्यामुळे पेट्रोलचे भाव लिटरमागे जवळपास ६७ पैश्याने कमी झालेले दिसून येत आहे.

अमेरिकेची इराणवर बंदी

अमेरिकेने इराणवर इंधन विक्रीसाठी लादलेल्या बंदीनंतर आता भारत इराणकाडून इंधन खरेदी करू शकत नाही. मागील महिन्यापासून भारताने इराणकडून तेल विकत घेतलेले नाही, मात्र तरीदेखील छुप्या आणि अनधिकृत मार्गाने आपण तेलविक्री करत असल्याची माहिती इराणचे पेट्रोलियममंत्री बिजान झांगनेह यांनी दिली आहे. मात्र कोणत्या देशांना आपण अशाप्रकारे विक्री करत आहोत याची मात्र त्यांनी माहिती दिली नाही.