‘या’ ठिकाणी अजूनही मतमोजणी सुरूच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नरेंद्र मोदी यांचा जयघोष होत असताना अजूनही एका जागेची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याची वस्तुस्थिती अरुणाचल प्रदेशात आहे.

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होऊन २८ तास उलटले असले तरी अरुणालाचल प्रदेशात एका जागेची अद्याप मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. लोकसभेसाठी ५४३ पैकी ५४२ जागांवर मतदान झालं होतं. त्यातील ५४१ जागांचे अधिकृत निकाल आतापर्यंत जाहीर झाले आहेत मात्र अरुणाचल प्रदेशात लोकसभेच्या दोन जागा असून यापैकी अरुणाचल पश्चिम मतदारसंघाचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. या मतदारसंघात अजूनही मतमोजणी सुरू आहे.

केंद्रीय मंत्री व भाजप नेते किरेन रिजिजू आणि काँग्रेसचे नबाम तुकी यांच्यात येथे मुख्य लढत असून २ लाख २३ हजार ३६२ मते घेत रिजिजू यांनी येथे मोठी आघाडी घेतली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार तुकी यांना ५० हजार ७२५ मते आतापर्यंत मिळाली आहे. रिजिजू यांची आघाडी पाहता त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे. रिजिजू यांनी २०१४ मध्ये याच मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार तकाम संजय यांचा पराभव केला होता.