झोपडपट्टीत राहून कंत्राटी काम करत तिनं मुलाला बनवलं डॉक्टर; उच्च शिक्षणासाठी आली इंग्लंडमधून संधी ! लोकांना केलं मदतीचं आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – झोपडपट्टीतील लहान जागेत वास्तव्य करत कुणाचाही आधार नसताना आणि जेमतेम पगार असताना एका महिलेनं आपल्या मुलाला अत्यंत हालअपेष्टा सह करत डॉक्टर केलं. आता त्या मुलाला पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याची संधी उपलब्ध झाली आहे. परंतु आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यानं ते स्वप्न काही पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळं आता कुटुंबानं मदतीचं आवाहन केलं आहे. महिलेचं नाव कल्पाना आढाव असून अमित असं या डॉक्टर झालेल्या मुलाचं नाव आहे.

कल्पना आढाव आणि अमित पिंपरी झोपडपट्टीतील छोट्याशा जागेत राहतात. गेल्या 14 वर्षांपासून कल्पना आढाव पालिकेतील रुग्णालयात कंत्राटी पद्धतीनं सुरक्षा कर्मचारी म्हणून काम करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. त्यांना सुरुवातीला फक्त 3 हजार रुपये पगार मिळत होता. आता त्यांना 14 हजार पगार मिळतो. मुलगा अमित याला शिकवून मोठ्या हुद्द्यावर बसलेलं पहायचं असं त्यांचं स्वप्न होतं.

आर्थिक स्थिती बेताची असल्यानं ते शक्य होण्यासारखं नव्हतं. तरीही त्यांनी शर्थीनं प्रयत्न केले. फक्त रुग्णालयाचंच काम नाही तर त्यांनी अनेकाकंडे धुण्या-भांड्याचं काम केलं. बऱ्याच वर्षांचा खडतर प्रवास पार करत त्यांनी मुलाला जिद्दीनं डॉक्टर केलं. आता पुढील उच्च शिक्षणासाठी इग्लंडला जाण्याची संधी त्याला मिळाली आहे.

परंतु तिकडं जाण्याचा विचारही अमितला करता येत नाहीये. कारण आतापर्यंतचं त्याचं शिक्षण कसंबसं पूर्ण झालं आहे. यानंतर आता कल्पना आढाव यांनी आवाहन केलंय की, मी कसंबसं त्याचं शिक्षण केलं आहे. यापुढे माझ्याकडून होणार. त्यामुळं अमितच्या उच्च शिक्षणासाठी दानशूर व्यक्तींनी तसंच संस्थांनी मदत करावी असं त्या म्हणाल्या आहेत.