‘बारामती ॲग्रो’चा तो फोटो शेअर करत भाजपचा पवार कुटुंबीयांवर ‘निशाणा’, केलं हे गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात मागील दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. आंदोलक आणि केंद्र सरकारमध्ये सुरु असलेल्या चर्चांमधून या आंदोलनावर तोडगा निघत नसल्याने कृषी कायद्यांबाबतचा तिढा कायम आहे. आंदोलक शेतकऱ्यांबरोबर देशातील विरोधक भाजपवर निशाणा साधत आहे. दरम्यान, याच मुद्यावरून आता भाजपने विरोधकांवर प्रतिहल्ला करण्यास सुरुवात केली आहे.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी बारामती ॲग्रोची एक जाहिरात ट्विटरवर शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीयांवर निशाणा साधला आहे. शेतकरी आंदोलनामध्ये करार पद्धतीने शेती हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे. त्या माध्यमातून देशातील शेती ही उद्योगपतींच्या घशात घालण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याच दावा केला जात आहे. त्याला अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

अतुल भातखळकर यांनी बारामती ॲग्रोची जाहिरात शेअर केली आहे. या जाहिराती मध्ये करार शेतीचे फायदे सांगण्यात आले आहेत. यामध्ये वर्षभर हमीभावाने खरेदी, क्रेडिटवर बियाणे, रोपांचा पुरवठा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे काही फायदे सांगण्यात आले आहेत. बारामती ॲग्रोचा फोटो शेअर करताना भातखळकर यांनी लिहिले आहे की, शेतकरी कायद्यांना विरोध करणाऱ्या राजकारणी मंडळींच्या कॉन्ट्रॅक्ट फर्मिंगच्या कंपन्यांचे बॅनर पाहून आनंद झाला. हा दुटप्पीपणा किळसवाणा आहे, असे ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे.