काय सांगता ! होय, चक्क पोलिस निरीक्षकानं धरला डिजेवर ठेका, आता झाले नियंत्रण कक्षाशी संलग्न

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – राम मंदिर निर्मितीसाठी देशभरातून निधी जमा केला जात आहे. त्यानुसार हजारो भक्तांनी आत्तापर्यंत दान दिले आहे. याच मदत निधीसाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत रामभक्तांसोबत पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी डिजेवर ठेका धरला होता. आता हेच प्रकरण गायकवाड यांच्या अंगलट आले असून, त्यांची रवानगी नियंत्रण कक्षात करण्यात आली.

एमआयएमचे जिल्हाध्यक्ष मिर्झा बेग यांनी पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी एका धार्मिक मिरवणुकीत डिजेच्या तालावर ठेका धरला होता. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी एका निवदेनाच्या माध्यमातून केली होती. याबाबतचे निवेदन त्यांनी नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी आणि पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांना दिले होते. या निवेदनानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेत त्यांची रवानगी नियंत्रण कक्षात केली आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
हनुमंत गायकवाड यांनी मिरवणुकीत धरलेल्या ठेक्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या माध्यमातून पोलिस खात्याची बदनामी झाली. ही बाब गंभीर असून, यामध्ये हनुमंत गायकवाड यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांना नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले.