हप्ता न दिल्याच्या रागातून गावगुंडांकडून तरुणाचा कुऱ्हाडीनं ‘वर्मी’ घाव घालून खून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – गावात बांधकाम करायचे असेल तर पैसे द्यावे लागतील असे म्हणून बांधकाम मजुराचा कुर्‍हाडीने वार करून खून करण्यात आला आहे, तर एकाच्या खूनाचा प्रयत्न करण्यात आला. पाथर्डी तालुक्यातील रांजणी येथे ही घटना घडली. साहील उर्फ सोन्या मुबारक पठाण असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. हप्ता न दिल्याच्या रागातून गावगुंडांनी साहिलच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केला. साहील पठाण हा खोसपुरी येथील रहिवासी आहे.

याप्रकरणी मंगळवारी रात्री पाथर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत इरफान हसन पठाण (वय- 20, रा. खोसपुरी ता-जि अहमदनगर) हे जखमी झालेले आहेत. याप्रकरणी बुट्या पवार, साहेबराव तुकाराम पवार (दोघे रा. रांजणी, ता. पाथर्डी) व इतर दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे हप्ता वसुलीची कीड आता ग्रामीण भागातही पसरली असल्याचे दिसून येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी तालुक्यातील रांजणी येथील नवनाथ घोडके यांच्या घराच्या बांधकामाचा ठेका मुबारक पठाण यांनी घेतला होता. या बांधकामावर इरफान पठाण, रसूल बेग, युनूस पठाण, साहिल पठाण हे मजुरीचे काम करत होते. मंगळवारी सकाळी वाळू चाळण्यास सुरुवात केली असता दुपारी एक वाजता गावातील गावगुंड बुट्ट्या पवार आणि साहेबराव पवार यांच्यासह इतर दोघे त्या ठिकाणी आले. त्यांनी साहिल पठाण याला बाहेरील मजुरांना या गावात आम्हाला हप्ता द्यावा लागतो, असे सांगितेले.

दरम्यान, घर मालक घोडके यांनी मध्यस्थी करून आरोपींची समजूत काढली. तरीही त्यांनी साहिल याला खंडोबा मंदिरा जवळच्या बोळीत नेले. त्याठिकाणी आरोपींनी साहिलच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या साहीलला तातडीने पाथर्डी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याठिकाणी प्रथमिक उपचार करून त्याला नगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, वर्मी घाव बसल्याने आणि रक्तस्त्राव जास्त झाल्याने साहिलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Visit : policenama.com