सावेडी चे नाट्यगृह पूर्ण करण्यास ठेकेदारास एक वर्षाचा अल्टिनेटम

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रोफेसर कॉलनी चौकात उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक व भव्य नाट्यगृहाच्या कामास महापौर बाबासाहेब वाकळे व उपमहापौर मालन ढोणे यांनी आज सकाळी अचानक भेट देऊन कामाची पाहणी केली. धीम्या गतीने होत असलेल्या कामाबद्दल यावेळी महापौर उपमहापौर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी ठेकेदार रसिक कोठारी यांची चांगलीच कानउघडणी केली. एक वर्षाच्या आत नाट्यगृहाचे काम पूर्ण करण्याचा अल्टीनेटम यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिला.

तसेच येत्या मार्चएन्ड पर्यंत आरसीसी बांधकाम पूर्ण झाले पाहिजे अशी सूचना उपमहापौर मालन ढोणे यांनी दिली. ठेकेदार रसिक कोठारी यांनी निधी अभावी काम होत नसल्याचे यावेळी निदर्शनास आणून दिले. यावेळी नगरसेवक मनोज दुल्लम, नगरसेविका आशा कराळे, शहर अभियंता विलास सोनटक्के, उपअभियंता मनोज पारखे, श्रीकांत निंबाळकर, भाजपचे सतीश शिंदे, शिवाजी कराळे, पुष्कर कुलकर्णी, उदय कराळे, किशोर कानाडे, ठेकेदार रसिक कोठारी, आर्किटेक नेहा शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर वाकळे म्हणाले, नगर शहराला शहरपण येण्यासाठी जसे इतर मोठ्या विकास कामांची गरज आहे तेवढेच शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या या नाट्यगृहाचे काम त्वरित पूर्ण करणेही गरजेचे आहे. शहरातील नागरिकांची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी नाट्यगृहाचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षापासून या नाट्यगृहाचे काम संथ गतीने चालू आहे. यापुढे आता काम न थांबवता एक वर्षाच्या आत या नाट्यगृहाचे काम पूर्ण झाले पाहिजे.  यासाठी पैशाची कमतरता पडणार नाही. राज्य सरकारकडून वेळोवेळी निधी उपलब्ध करुन देऊ. नवीन बांधकामास अडथळा येत असलेल्या जुन्या स्पर्धा परीक्षा केंद्रा ची इमारत पाडून तेथे तातडीने काम सुरू करण्याचे आदेश देत आहे. तसेच दर आठ दिवसांनी या कामाची पाहणी करून प्रगतीचा आढावा घेणार आहोत. उपमहापौर मालन ढोणे यांनी मार्च एण्ड पर्यंत नाट्यगृहाचे संपूर्ण आरसीसी काम पूर्ण करण्याच्या सूचना करून ठेकेदाराने जर वेळेत सर्व काही कामे संपली तर जाहीर सत्कार त्यांचा महापालिकेत करू असे सांगितले.

यावेळी शहर अभियंता विलास सोनटक्के यांनी नाट्यगृहाच्या बांधकामाबद्दल सविस्तर माहिती दिली,  सुमारे 1000 बैठक व्यवस्था ची क्षमता असलेले हे महाराष्ट्रातील भव्य व आकर्षक नाट्यगृह असणार आहे. पुढील पंचवीस वर्षाचा विचार करून या नाट्यगृहाच्या कामाचा  प्लॅन केला आहे. अत्याधुनिक ग्रीन रूम, कलाकारांसाठी रेस्ट रूम, आकर्षक आतील सजावट, भव्य बाल्कनी हे या नाट्यगृहाचे वैशिष्ट्य आहे