रोडरोमियोंना आवरा अन्यथा शाळा बंद करू 

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – रोडरोमियोंना शाळेबाहेर थांबण्यास मज्जाव करणाऱ्या मुख्याध्यापकास अंगावर जाऊन विट फेकून मारल्याचा प्रकार घडल्यानंतर शहरातील ४० शाळांचे मुख्याध्यापक आक्रमक झाले असून त्यांनी रोडरोमियोंना आवरा, अन्यथा शाळा बंद करू असा इशारा देणारे निवेदन पोलीस प्रशासनाला दिला आहे.

शहरांमध्ये मुलींच्या छेडछाडीचे प्रकार घडत असतात, शाळकरी मुली, महाविद्यालयीन तरुणी, त्यासोबतच महिलांनाही मोठा मनस्ताप सहन कारवा लागतो. विशेष म्हणजे शाळा, महाविद्यालय, ट्युशन्स आदी ठिकाणी बाहेर थांबणाऱ्या रोडरोमियोंमुळे हा त्रास जास्त सहन करावा लागतो. दरम्यान परभणी येथील भारतीय बालविद्या मंदिर या शाळेसमोर काही रोडरोमियोंनी उच्छाद मांडला होता. त्यावेळी त्या रोडरोमियोंना इथे थांबू नका असे सांगण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आनंद देशमुख गेले. मात्र मुलींना पहण्यासाठी जमलेल्या रोडरोमियोंना मुख्याध्यापकांचे बोलने खटकले, त्यावेळी संतापलेल्या रोडरोमियोंनी मुख्याध्यापकांना शिवीगाळ केली. इतक्यावरच न थांबता त्यांच्या अंगावर धावत जाऊन त्यांना विट फेकून मारली.

विशेष म्हणजे, हा त्रास शहरातील सर्वच शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थिनींना सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील ४० शाळांच्या मुख्याध्यापक एकत्र येऊन पोलीस अधीक्षकांना रोडरोमियोंना आवरा, अन्यथा शाळा बंद करू असा इशारा देणारे निवेदन दिले आहे.

इतकेच नव्हे तर याआधीसुद्धा विद्यार्थिनींच्या पालकांकडून, शाळा, महाविद्यालय, ट्युशन्स आदी ठिकाणी बाहेर थांबणाऱ्या रोडरोमियोंमुळे होणाऱ्या त्रासाला आवरा असे निवेदन देण्यात आले होते.