शेती विषयक विधेयके आज राज्यसभेत मांडले जाणार, संख्याबळासाठी भाजपकडून जमवाजमव

पोलिसनामा ऑनलाईन – वादग्रस्त शेती विधेयके आज राज्यसभेत मांडली जाणार असून भाजपने पक्षादेश काढून सदस्यांना उपस्थित राहण्यास बजावले आहे. लोकसभेत आवाजी मतदानाने ही विधेयके मंजूर करण्यात आली असली तरी राज्यसभेत सत्ताधारी पक्षाकडे बहुमत नसल्याने संख्याबळाची जमवाजमव केली जात आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य, शेतकरी दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू ही तीनही विधेयके शेतकर्‍यांच्या हिताची नसल्याचा आरोप करत मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभेत अकाली दलाचे तीन सदस्य असून ते विधेयकाच्या विरोधात मतदान करणार आहेत. मात्र, आघाडीतून बाहेर पडून राज्यात दोन्ही काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार्‍या शिवसेनेने विधेयकांना पाठिंबा दिला आहे. राज्यसभेत शिवसेनेचे तीन सदस्य आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार सदस्य आहेत. या दोन्ही पक्षांच्या एकत्रित निर्णयाकडे भाजपचे लक्ष असेल. सद्य:स्थितीत 243 सदस्य संख्या असलेल्या राज्यसभेत भाजपकडे 86 सदस्य असून, अण्णा द्रमुक, जनता दल (संयुक्त), लोकजनशक्ती आणि छोटे पक्ष मिळून 102 पेक्षा जास्त संख्याबळ सत्ताधारी आघाडीकडे आहे.