भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांच्या मृत्युवर वादग्रस्त पोस्ट लिहिल्याप्रकरणी पत्रकारासह दोघे अटकेत

इंफाळ : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनामुळे मृत्यू झालेल्या भाजपा प्रदेशाध्यक्षांबाबत सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट लिहिल्याप्रकरणी मणिपूरमध्ये एका पत्रकारासह राजकीय कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पत्रकार किशोरचंद्र वांगखेम आणि राजकीय कार्यकर्ते एरेंड्रो लिचोम्बम असे अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने दोघांनाही 17 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष उषाम देबन आणि महासचिव पी. प्रेमानंद मितेई यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती.

प्राप्त माहितीनुसार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सैखोम टिकेंद्र सिंह यांच्या मृत्यूवर सोशल मीडियावर वांगखेम आणि लिचोम्बम या दोघांनीही आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. गोबर आणि गोमुत्र उपयुक्त ठरत नाहीत, अशी टीका केली होती. दरम्यान, पत्रकार वांगखेम यांना यापूर्वीही दोन वेगवेगळ्या प्रकरणात अटक झाली होती. तसेच मणिपूरमधील भाजपाशासित सरकारने त्यांच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदयातंर्गत देशद्रोहाचा आरोप केला होता. गेल्या आठवड्यात कोरोना विषाणूपासून बचावासाठी काही लोक गाईचे शेण आपल्या शरीराला फासत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावरून पत्रकार वांगखेम यांनी टीका केली होती.