शिवरायांचा पुतळा हटवल्याचा वाद चिघळला, मराठी आंदोलकांवर पोलिसांचा ‘लाठीचार्ज’ ?

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती गावातील मुख्य चौकात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात हलवण्यात आला. यामुळे शिवभक्त संतप्त झाले असून हा वाद आता पेटला आहे. मनगुत्ती येथे लोकांनी याविरोधात आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती समोर येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या घटनेला एक दिवस उलटला तरी अद्यापही कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे रविवारी मनगुत्ती गावातील मराठी भाषिक महिलांनी आंदोलन केले. मात्र, कर्नाटक पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढत आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केल्याने मनगुत्ती गावात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. सध्या गावामध्ये सशस्त्र पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक निम्बर्गी हे मनगुत्ती गावात दाखल झाले आहेत. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या स्थितीत तात्काळ बसवावा, अशी मागणी सीमा भागातील मराठी बांधवांनी केली आहे. दरम्यान, याबाबत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन झाली. मात्र, कर्नाटक राज्य सरकार किंवा बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. पोलिसांच्या लाठीचार्जच्या घटनेनंतर मनगुत्ती गावात तणावपूर्ण शांतता आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यात भाजपचे नेते नितेश राणे यांनी या प्रकरणात उडी घेत आगीत आणखी तेल ओतण्याचे काम केले आहे. शिवरायांचा पुतळा काँग्रेस आमदार सतीश जारकीहोळी यांनी हटवला असल्याचा खळबजनक आरोप केला आहे. तर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरुन राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर निशाणा साधला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like