‘पद्म पुरस्कार’ समितीच्या अध्यक्ष पदावरून नवा वाद !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावांची शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीला विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विरोध दर्शवत समितीच्या अध्यक्षपदावरुन आदित्य यांना हटवण्याची मागणी केली आहे.

केंद्र सरकारतर्फे दरवर्षी हे पुरस्कार कला, साहित्य, विज्ञान, शिक्षण, उद्योग, क्रीडा, वैद्यक, सामाजिक सेवा इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. त्यासाठी प्रत्येक राज्यातून नावे कळवली जातात. त्यानंतर केंद्राचा गृहविभाग नावांची छाननी करुन पद्म पुरस्कारासाठी त्यांची निवड करतो. नावांच्या शिफारशीसाठी एक समिती राज्य स्तरावर असते, राजशिष्टाचार मंत्र्याकडे त्याचे अध्यक्षपद असते. महाराष्ट्रात १० वर्षांपासून ही परंपरा आहे.

दरम्यान, यासंदर्भात बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, यावर्षी केंद्र आणि राज्यात दोन वेगळ्या पक्षांची सरकारे असल्याने काहीतरी नवीनच घडत असल्याचं भासवून राजशिष्टाचार मंत्री कनिष्ठ आहेत. त्या जागी जेष्ठ मंत्र्याची नेमणूक अध्यक्ष म्हणून केली पाहिजे. भाजपच्या काळात काही वर्षे प्रकाश मेहता, नंतर राम शिंदे राजशिष्टाचार मंत्री होते. त्याआधी सुरेश शेट्टींकडे हा विभाग होता.

यावरती बोलताना सुरेश शेट्टी यांनी सांगितलं, मी मंत्री असताना अनेक जेष्ठ मंत्री होते, तरी सुद्धा माझ्याकडे अध्यक्षपद होते. त्यावेळी चर्चा झाली नाही. आता राजकारणासाठी ही चर्चा केली जात असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कोट्यवधींचा घोटाळा करण्यात असलेले प्रमुख आरोपी सुनील केदार हे समितीत सदस्य असल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.