उदय सामंतांविरोधात जितेंद्र आव्हाडांची तीव्र शब्दात नाराजी, शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये कुरघोडी ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांमध्ये एकमेकांविरुद्ध नाराजी असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. त्यातच आता म्हाडाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान उच्च व तंत्र व शिक्षण मंत्री उदय सामंत आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद उफाळून आला आहे. जितेंद्र आव्हाड यांना पूर्ण कल्पना न देता गृहनिर्माण खात्याची बैठक उदय सामंत यांनी घेतल्याने या वादाला तोंड फुटले आहे.

तथापि, बुधवारी कॅबिनेट बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी वार्ताहरांना बोलताना याबद्दल तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, नियमानुसार एखाद्या खात्याच्या मंत्र्याला स्वतःच्या खात्याबाबत बैठक घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, मला पूर्व कल्पना न देता उदय सामंत यांनी माझ्या खात्याची बैठक बोलावल्याचे मला कळले, किमान माझ्या खात्याची बैठक घेताना मंत्र्यांनी मला कळवायला हवे होते.

अशा वागणुकीमुळे गैरसमज निर्माण होतात. पूर्वकल्पना दिली तर आम्ही एकत्रित आणि निर्णायक पद्धतीने काम करु शकतो, असेही त्यांनी म्हटलं. दरम्यान, यावरती स्पष्टीकरण देताना मंत्री उदय सामंत यांनी अशाप्रकारे कोणतीही बैठक बोलवली नसून, जितेंद्र आव्हाडांना काहीतरी गैरसमज झाल्याचे म्हणाले.

युती काळात देखील असा वाद समोर आला होता.
भाजप-शिवसेना सरकारच्या काळात तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी उद्योगमंत्र्यांच्या परवानगी शिवाय पुण्यातील एमआयडीसी जागेबाबत बैठक बोलावली होती. तेव्हा जमीनमालकाला नुकसान भरपाई देण्याचे निर्देश खडसेंनी अधिकाऱ्याला दिले होते. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय परिपत्रक काढत प्रोटोकॉल पाळण्याचे आदेश दिले होते. तसेच अन्य खात्याच्या बैठका संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीशिवाय घेऊ शकणार नाही, असेही म्हटलं होते.