जनता संचारबंदीच्या निर्णयावर नगरमध्ये राजकीय कुरघोड्या

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जनता संचारबंदी लागू करण्यासाठी नगरमध्ये विविध राजकीय पक्षांकडून एकमेकांवर कुरघोडी केली जात आहे. त्यामुळे या प्रयोगांना राजकीय वादाची लागण झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारची शिथिलतेकडे वाटचाल सुरू असताना राजकीय पक्षामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे दिसून आले आहे.

नगरमध्ये जनता संचारबंदीचा निर्णय लागू करण्याबाबत प्रत्येक पक्षाने वेगवेगळी भूमिका मांडली आहे. पालकमंत्री मुश्रीफ यांनी जनता संचारबंदीला नकार दिला तरी आमदार संग्राम जगताप आणि महापौर वाकळे यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेतल्यास त्यांच्या पाठीशी उभे राहू असे म्हटले आहे . मात्र प्रशासन त्यामध्ये सहभागी असणार नाही असे स्पष्ट केले. गरीब नागरिकांचा विचार करता, असे निर्णय पुन्हा नकोत, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीचे आमदार जगताप यांनी संदिग्ध भूमिका ठेवली आहे. नागरिकांनी मागणी केली तर जनता संचारबंदीचा निर्णय घेऊ असे ते म्हणाले. भाजपचे महापौर वाकळे यांनी किमान 10 दिवस संचारबंदी लागू करावी, असे मत व्यक्त केले आहे. शिवसेनेने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. शहरातील काही सामाजिक, स्वयंसेवी संघटनांनी जनता संचारबंदीची मागणी केली आहे. व्यापारी संघटना मात्र त्या विरोधात आहेत. या निर्णयासाठी आता आमदार आणि महापौर एकत्रित मते आजमावणार आहेत. महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी सत्तेसाठी एकत्र असले तरी संचारबंदीबद्दल विरुद्ध भूमिका आहेत. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी प्रथम नगर शहरात पुन्हा लॉकडाउन करण्याची मागणी केली आहे.