निर्भया केस : डेथ वॉरंट जारी झाल्यानंतर दोषींच्या वकिलांचा ‘थैयथयाट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भयाला न्याय कधी मिळणार असा सवाल सर्वच जण विचारत आहेत. यानंतर आज दिल्ली पटियाला हाऊस न्यायालयाने दोषींना फाशीचे नवे डेथ वॉरंट बजावले आहे. चौथ्यांदा बजावण्यात आलेल्या डेथ वॉरंटनुसार दोषींना 20 मार्चला सकाळी 5.30 वाजता फाशीची वेळ निश्चित केली आहे. परंतु या निकालानंतर दोषींचे वकील ए पी सिंह यांनी आपल्याकडे अद्यापही कायदेशीर पर्याय उपलब्ध असल्याचे माध्यमांना सांगितले. दोषींना अनेकदा फाशी सुनावण्यात आली आहे, ही न्यायिक हत्या आहे असे ते म्हणाले.

दबावाखाली निकाल – दोषींचे वकील
पवन गुप्ता, विनय शर्मा, अक्षय ठाकूर, मुकेश अशी या दोषींची नावे आहेत. निकालानंतर माध्यमांशी बोलताना दोषींचे वकील संतापलेले दिसले. ते म्हणाले की आज चौथ्यांदा वॉरंट जारी करण्यात आले, त्यांना या अगोदरच तीन वेळा फासावर चढवलं गेलंय आता आणखी किती वेळा? संविधान असताना मीडियाच्या दबावाखाली कितीवेळी फाशी देणार? ते काही दहशतवादी नाहीत, शिकलेले आहेत आणि तुरुंगात राहून परिवर्तन साधत आहे. तुमचा आरडा ओरडाच सांगतोय की किती दबाव आहे.

दोषींना वेगवेगळी फाशी –
अक्षयकडे अद्याप कायदेशीर पर्याय आहे. अक्षयची दया याचिका तुरुंगात घेतली गेली. तुरुंगात अक्षयची दया याचिका आहे का असा सवाल न्यायालयाने विचारला तेव्हा तुरुंग प्रशासनानं या प्रश्नाचं उत्तर हो असं दिलं असे ए पी सिंह म्हणाले. आजच सर्वोच्च न्यायालयात आणखी एक सुनावणी होणार आहे, केंद्र सरकारने दोषींना वेगवेगळी फाशी देण्यासाठी याचिका दाखल केली होती.

न्यायालयाने मला धमकावलं – ए. पी. सिंह
ए पी सिंह यांनी न्यायालयावर गंभीर आरोप केले आहेत. तुम्ही आगीशी खेळ खेळत आहात, खेळत राहा… तुमच्यासाठी याचे परिणाम वाईट होतील, असे मला न्यायालयाने सांगितले. याचा अर्थ मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला धमकावलं जातंय. याचा अर्थ कायदेशीर अधिकार वापरणं चुकीचे आहे, असा आहे का ? असेही ते यावेळी म्हणाले.