सहकारमंत्र्यांचा बंगला अनाधिकृत – सोलापूर महापालिका आयुक्तांचा अहवाल

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन

मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा बंगला अखेर महापालिकेनं बेकायदेशीर असल्याचा अहवाल सादर केलाय. सोलापूर महापालिकेच्या आयुक्तांनी अशा प्रकारचा २६ पानी अहवाल उच्च न्यायालयात सादर केला आहे. यामुळे सहकारमंत्र्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सुभाष देशमुख यांचा हा बंगला अग्निशमन दलाच्या आरक्षित जागेवर असल्याचं अहवालात नोंद केली आहे. तसेच अनेक आक्षेपही या बंगल्याच्या बांधकामावर अहवालात नोंदवले आहेत. दरम्यान हा अहवाल सादर करताच सोलापूर महापालिकचे आयुक्त अविनाश ढाकणे हे तुरंत रजेवर गेले आहेत.

मागील बऱ्याच दिवसांपासून सुभाष देशमुखांच्या बंगल्याच्या भवितव्याबात उलट सुलट चर्चा सुरू होत्या मात्र आज खुद्द सोलापूर महापालिका आयुक्तांनी हा अहवाल सादर करून सर्व चर्चांना विराम दिला आहे.

हा अहवाल सादर केल्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “अहवाल पूर्ण वाचला गेला नाही , हा महापालिकेचा दोष आहे. रोख पैसे भरून हा परवाना घेतला आहे, आता महापालिकेने हा परवाना कसा दिला हे तपासून घ्यावं लागेल. परवान्यानुसार बांधकाम केलं आहे, या प्रकरणात फेरचौकशीची गरज असून , सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा तसेच कोर्ट जो निर्णय देईल तो मला मान्य असेल ” सोबतच सुभाष देशमुख यांनी असंही म्हटलय की जर मी दोषी आढळलो तर मंत्रीपदाचा राजीनामा देईन.
हे प्रकरण समोर येताच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्‍यांकडे हा बंगला जमीनदोस्त करण्याची मागणी देखील केली.

दरम्यान या बंगल्याच्या विरोधात य़ाचिका दाखल करणारे महेश चव्हाण यांना सर्व पुराव्यानिशी हजर राहण्याचे आदेश महापालिकेने दिले होते. याचिकाकर्ते महेश चव्हाण यांनी त्यांच्या याचिकेत असं स्पष्टपणे म्हटलं होतं की हा बंगला अग्नीशमन विभाग आणि व्यापारी गाळ्यांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर अनधिकृतरित्या बांधला गेला आहे. या याचिकेनंतर महापालिकेनं हे प्रकरण गंभीररित्या हाताळण्यास सुरूवात केली. हे प्रकरण इतकं वाढलंय की सहकारमंत्र्यांची खुर्ची या प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे, त्यामुळे मंत्र्‍यांची खुर्ची टिकणार की नाही हे आता उच्च न्यायालयाच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील या प्रकरणात काय भूमिका घेणार हे पहाणं देखील औत्सुक्याचं असणार आहे.