सौदीतील तेल उत्पादन निम्म्यावर, तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता

दुबई : वृत्तसंस्था – सौदी अरेबिया हा जगभरात तेल निर्यात करणारा मोठा देश आहे. इराणच्या हुती बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या अरामको तेल कंपनीच्या दोन मोठ्या रिफायनरींवर ड्रोनच्या सहाय्याने हल्ला केला. बंडखोरांनी अबाकिक आणि खुराइस येथील तेल क्षेत्रांवर हवाई हल्ले केल्यानंतर सौदी अरेबियाने निम्मे तेल उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता-

इराणचा पाठिंबा असणाऱ्या येमेनमधील हुती बंडखोरांनी शनिवारी अरामको’ या तेल कंपनीवर हल्ला केला. सौदी अरेबियाने येमेनमधील हुती नियंत्रित क्षेत्रात हल्ले केल्याच्या रागातून हे हल्ले करण्यात आल्याची माहिती आता पुढे येत आहे. या हल्ल्यामध्ये अरामकोच्या अबाकिक आणि खुराइस या दोन केंद्रांना आगी लागल्या. या आगींवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचा दावा सौदी अरेबियाकडून करण्यात आला होता. मात्र, सौदी अरेबियाच्या तेल निर्यातीला त्याचा फटका बसला आहे. सौदी अरेबियाच्या सर्वांत मोठ्या अरामको या तेल कंपनीवर झालेल्या ड्रोन हल्ल्याचा परिणाम तेलपुरवठ्यावर झाला आहे. सौदी अरेबियाकडून होणारा निम्मा तेलपुरवठा थांबला आहे. या निर्णयामुळे तेलपुरवठ्यावर परिणाम झाल्याने तेलटंचाईच्या धोक्याबरोबरच तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

अमेरिकेची इराणवर टीका –

शनिवारच्या अरामको हल्ल्यासाठीही दहा ड्रोन पुरवले गेले आहेत, असा सौदीचा आरोप आहे. याआधी सौदी अरेबियानेही इराणवर बंडखोरांना शस्त्रास्त्रे पुरविल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो यांनी अरामकोवर झालेल्या हल्ल्याला इराणला जबाबदार धरले आहे. पोम्पियो म्हणाले, इराणने जगभरातील ऊर्जेच्या गरजांवरच हल्ला केला आहे.

You might also like