निवडणूक कामांसाठी समन्वय समित्या स्थापन

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूक काळात करावयाच्या विविध कामांसाठी समन्वय समिती कार्यान्वित करण्यात आल्या असून या समित्यांनी त्यांच्या कामांना सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी सर्व समित्यांच्या नोडल अधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांना कामकाजाबाबत सूचना दिल्या.

जिल्ह्यातील ३७-अहमदनगर आणि ३८-शिर्डी (अ.जा.) या दोन लोकसभा मतदारसंघात अनुक्रमे २३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दिनांक 10 मार्च रोजी निवडणूक कार्यक्रम झाल्यानंतर तात्काळ जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत, नि:ष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी विविध समन्वय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यांत मनुष्यबळ व्यवस्थापन आणि संगणकीकरण, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट व्यवस्थापन, परिवहन व्यवस्थापन, प्रशिक्षण, साहित्य पुरवठा आणि व्यवस्थापन, आचारसंहिता अंमलबजावणी, खर्च संनियंत्रण, कायदा व सुव्यवस्था, माध्यम कक्ष, मतदानजागृतीसाठी स्वीप कक्ष, मतदारांसाठी हेल्पलाईन आणि तक्रार निवारण कक्ष, निवडणूक व्यवस्थापन आराखडा, मतमोजणी नियोजन आराखडा आदींसाठी नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकार्‍यांची बैठक घेऊन जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. द्विवेदी यांनी कामकाजासंदर्भात सूचना दिल्या.

प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरु होण्यास अवधी असल्याने कामकाजासंदर्भातील तयारी करण्यास वेळ आहे. भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आणि वेळोवेळी त्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे कार्यवाही केली तर प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडेल. त्यासाठी सर्व यंत्रणांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी बिनचूक पार पाडणे आवश्यक आहे. आवश्यक मनुष्यबळाचा योग्य वापर करुन आणि त्यांना ज्या कामांसाठी नियुक्त केले आहे, त्याचे प्रशिक्षण देऊन सज्ज करणे आवश्यक आहे.

कामकाजासंदर्भात कोणत्याही शंका मनात ठेवू नका. प्रशिक्षण कालावधीत त्या शंकांचे निरसन करुन घ्या. प्रत्यक्ष कामकाजात कोणतीही अडचण येणार नाही, यादृष्टीने तयारी करण्याच्या सूचना त्यांनी सर्व नोडल अधिका-यांना केल्या. कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरुच ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

ह्याही बातम्या वाचा –

युतीचा प्रचार ठरला ; ‘या’ शहरात फोडणार प्रचाराचा नारळ 

भीषण आगीत उसतोड कामगारांच्या झोपड्या जळून खाक 

सुजय विखे भाजप प्रवेशानंतर आज जाणार ‘मातोश्री’वर   

ससूनच्या महिला डॉक्टरला भाजपच्या नगरसेविकेकडून मारहाण