‘दरोडा’ घालणारा LCB चा ‘तो’ पोलीस तडकाफडकी निलंबित

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पारनेर तालुक्यातील निघोज येथे एका व्यापाऱ्याचे गोडावून फोडून ५ लाखांचा गुटखा लंपास करत तो परस्पर विक्री करणाऱ्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीतील पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. व्यापाऱ्याचे गोडावून फोडतानाचा प्रकार सीसीटिव्हीतून उघड झाला आहे. त्यानंतर याची गंभीर दखल घेत पोलीस अधिक्षकांनी ही कारवाई केली.

पोलीस नाईक पोपट मुरलीधर गायकवाड असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पोलीस अधिक्षकांनी घेतली गंभीर दखल

पुणे ग्रामीण पोलीस दलातील खाकीची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी कारवाईचा बडगाच उगारला आहे. दरम्यान पोलीस नाईक पोपट गायकवाड याची पुण्यात एलसीबीमध्ये नेमणूक असताना तो १९ मे ते २० मे २०१९ दरम्यान मुख्यालय सोडून परस्पर निघोजला गेला होता. तसेच त्याने मित्रांच्या व साथीदारांच्या मदतीने दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन गोडावून फोडले आणि ५ लाख रुपयांचा गुटखा चोरून आणला. त्याची परस्पर विक्री केली. याची गंभीर दखल पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी घेतली. त्यानंतर त्याचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याने त्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

असा आहे प्रकार

पारनेर तालुक्यातील निघोज येथे मळगंगा मंदिराजवळ एका व्यापाऱ्याचे गोडावून आहे. शनिवारी पहाटे पोलीस कर्मचारी पाहणी करून गेला होता. त्यानंतर रविवारी पहाटे २ तरुणांना घेऊन तो परत आला. गाडी गोडावूनसमोर उभी करून दोघा तरुणांसह थांबला. त्यानंतर तेथे जवळच असलेल्या पोलीस ठाण्याजवळच्या रखवालदारांशी गप्पा मारत उभा राहिला. त्यानंतर माल मिळाल्याचे लक्षात आल्यावर पोबारा केला. मात्र व्यापाऱ्याने सीसीटिव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यात हा पोलीस कर्मचारी दिसला.