बारामतीतील ‘तो’ पोलीस सेवेतून बडतर्फ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – १२ हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडलेल्या बारामतीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या चालक सहायक पोलीस फौजदाराला सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी दिले आहेत.

लक्ष्मण दादू झगडे, ( वय ५७, सहायक पोलिस उपनिरीक्षक, रा. मु. पो. ता.इंदापूर, जि पुणे)असे बडतर्फ करण्यात आलेल्याचे नाव आहे.

अवैधपणे चंदनाच्या लाकडाची चोरी व वाहतुक केल्याप्रकऱणी यापुर्वी भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यात मदत करणे व पुन्हा चंदनाच्या वाहतुकीसाठी मदत करण्यासाठी सहायक उपनिरीक्षक लक्ष्मण दादू झगडे यांने १२ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी अँटी करप्शनकडे याची तक्रार केली. त्यानंतर अँटी करप्शनच्या पथकाने याची पडताळणी केल्यानंतर सापळा रचला. आज झगडे याला बारामतीतील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालायाजवळील उसाच्या रसाच्या दुकानाजवळ तक्रारदाराकडून लाच घेताना रंगेहात पकडले होते.

याप्रकरणी त्याच्याविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर याची गंभीर दखल पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी घेतली आहे. हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सहायक पोलीस फौजदार लक्ष्मण झगडे याला तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्याचा आदेश पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी दिला आहे.