Coronavirus Lockdown : सूरतमध्ये जमावाचा पोलिसांवर हल्ला, मालमत्तेचे मोठे नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. या काळात लोकांना विनाकारण घराबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तरीही काही भागांत लोक रस्त्यावर येत आहेत, त्यांच्यावर नियंत्रण ठेवताना पोलिसांवर ताण पडत आहेत. गुजरातमधील सूरत शहरात जमावाने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूरतचे पोलीस उप-आयुक्त आर.पी.बारोट यांनी दिली. यात एका पोलीस कर्मचार्‍याला दुखापतही झाली आहे.

सूरतमधील शहर भागात लॉकडाउनच्या नियमांचे पालन होत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यासाठी पोलिसांनी एक गाडी गस्तीवर निघाली होती. पोलिसांनी लोकांना घरात जाण्याचे आवाहन केले. यावेळी संतापलेल्या काही लोकांनी पोलिसांच्या गाडीवर हल्ला केला. काही जणांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेकही केली. घटनेची माहिती समजताच अधिक कुमक घटनास्थळावर मागवण्यात आली, यानंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र या घटनेदरम्यान जमावाने आजुबाजूच्या परिसरातील मालमत्तेचे नुकसान केले आहे. याआधीही अहमदाबाद शहरात परप्रांतीय मजूर रस्त्यावर आले होते. पण त्यावेळीही पोलिसांनी वेळेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले होते. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण गुजरातमध्ये सापडत आहेत. त्यामुळे सरकारी यंत्रणा परिस्थितीवर कधी नियंत्रण मिळवणार याकडे लक्ष आहे.