Coronavirus Update : भारतात 24 तासात 240 नवीन रुग्ण, मृतांचा आकडा वाढला

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून मागील 24 तासात देशात तब्बल 240 रुग्ण आढळले आहेत. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1 हजार 637 वर पोहचली आहे तर मृतांचा आकडा 38 वर पोहचला आहे. दरम्यान निजामुद्दीन परिषदेनंतर हा आकडा आणखी झपाट्याने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दिल्लीतील कॅन्सर रुग्णालयातील डॉक्टरला देखील कोरोनाची लागण झाली आहे. या डॉक्टरला व्हायरसची लागण कोठून आणि कशी झाली हे अद्याप समजले नाही. त्यानंतर संपूर्ण रुग्णालय सील करण्यात आले असून त्यांच्या कुटुंबाची आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

निजामुद्दीन तब्लिगी परिषदेने देश हादरला

देशभरात कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत असून नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. असे असताना दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तब्लिगी जमात परिषदेमुळे देशात खळबळ उडाली आहे. या परिषदेनंतर कोरोनाग्रस्त रुग्णांची आणि मृत्यांची संख्या वाढत आहे.

13 ते 15 मार्च दरम्यान या ठिकाणी देशातील विविध राज्यातून आणि परदेशातून या ठिकाणी लोक आले होते. या परिषदेला 2000 लोकं हजर असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परिषदेत हजर राहिलेल्यांपैकी 441 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. तर आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 6 लोकांचा तेलंगणात तर मुंबई, कर्नाटक आणि जम्मू काश्मीरमध्ये एकाचा मृत्यू झाला होता.