Lockdown in Maharashtra : राज्यात लॉकडाऊन वाढवणार का? जयंत पाटील म्हणतात…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन : राज्यात कोरोना व्हायरसचे संकट दिवसेंदिवस बिकट होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणांवर याचा मोठा ताण येत आहे. त्यातच राज्यातील निर्बंध 1 मेपर्यंत लागू असतील असे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता राज्यातील लॉकडाऊन आणखी वाढणार का? यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेटमंत्री जयंत पाटील यांनी भाष्य केले.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. यापूर्वी राज्यांतर्गत प्रवास करण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज भासत नव्हती. मात्र, 22 एप्रिलनंतर हे नियम बदलण्यात आले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यांतर्गत आणि राज्याबाहेरील प्रवासावरही बंदी घालण्यात आली. तसेच, लोकल आणि बससेवाही सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली आहे. ही नियमावली 1 मे पर्यंत असेल मात्र आता यामध्ये वाढ केली जाणार का असा प्रश्न विचारल्यानंतर जयंत पाटील यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘राज्यातील सर्व जिल्ह्यांचा स्थानिक आढावा घेतला जाणार आहे. त्यामध्ये ऑक्सिजन, बेड आणि व्हेंटिलेटरची परिस्थिती पाहून लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात येईल’.

दरम्यान, वाढती रुग्णसंख्या, ऑक्सिजन बेड्स, रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा, वैद्यकीय यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. तसेच अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यासाठी नर्सिंग स्टाफही मिळत नाही. त्यामुळे 1 मे नंतरही राज्यातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

…असे लागू केले निर्बंध

राज्य सरकारने 5 एप्रिलपासून कडक निर्बंध लागू केले होते. त्यानंतर 14 एप्रिलपासून या निर्बंधांमध्ये काही बदल करुन निर्बंध आणखी कडक केले आहेत. 22 एप्रिलपासून जिल्ह्यांतर्गत आणि राज्याबाहेरील प्रवासावरही बंदी घालण्यात आली. लोकल आणि बससेवाही सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली आहे.