Coronavirus : काय सांगता ! होय, सुरक्षिततेचे उपाय अन् मास्क नसल्याची डॉक्टरची तक्रार, तडकाफडकी निलंबनाची कारवाई

पोलिसनामा ऑनलाईन टीम –   जगभरात कोरोनाचा हाहाकार उडाला असतानाच डॉक्टरांना सुरक्षित साधनांचा अभाव असल्यामुळे राजकारण तापले आहे. अशातच आंध्र प्रदेशात सुरक्षेचे उपाय आणि मास्क नसल्याची तक्रार करणार्‍या डॉक्टरलाच निलंबित करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. काही दिवसांपूर्वी डॉक्टरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ आंध्र प्रदेशातील विरोधी पक्षातील नेत्याने शेअर केला होता. या व्हिडीओत डॉक्टर सुधाकर राव सुरक्षेचे उपाय आणि मास्क नसल्याची तक्रार करताना पोलिसांच्या गैरवर्तवणुकीबद्दलही बोलत होते.

रुग्णालयातील जिल्हा समन्वयक गरजेच्या वेळी उपस्थित नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. परिस्थिती गंभीर असताना एकाही मंत्र्याने औषधांचा मुबलक साठा आहे की नाही याची पाहण्याची करण्याती तसदी घेतली नसल्याचेही ते म्हणाले होते.या व्हिडीओत डॉक्टर सुधाकर राव यांनी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याकडे मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. पण सरकारने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. निलंबनाच्या कारवाईमुळे मोठा वाद निर्माण झाला असून सरकारवर टीका होत आहे. तेलुगू देसम पार्टीचे (टीडीपी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीदेखील सरकारवर टीकास्र सोडले आहे. चंद्राबाबू नायडू यांनी ट्विट करुन डॉक्टर सुधाकर यांनी सरकारी रुग्णालयात मास्क आणि ग्लोव्ह नसल्याचे उघड केले होते. ही तर सरकारची जबाबदारी आहे. या गंभीर मुद्द्याकडे लक्ष न देता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. एन 95 मास्क मागणे हा एकमेव त्यांचा गुन्हा होता. हे धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जर आरोग्य कर्मचार्‍यांना अशी वागणूक मिळत असेल तर त्यांचे कोरोनाशी लढताना मनोधैर्य कसे वाढेल अशी विचारणा त्यांनी केली आहे. हे निलंबन तत्काळ रद्द करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.