सौदी अरबवरून परतलेले भाजपा खासदार सुरेश प्रभु यांनी स्वत:ला केलं ‘क्वारंटाईन’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशभरात कोरोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. आतापर्यंत 141 पॉझिटीव्ह रूग्ण समोर आले आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लोकांनीही योग्य ती पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. मोदी सरकारमधील माजी मंत्री आणि भाजपा खासदार सुरेश प्रभु यांनी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. यापूर्वी केंद्रीय संसदीय कार्य राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी स्वत:ला क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

भाजपा खासदार सुरेश प्रभु 10 मार्चला सौदी अरबला गेले होते. यानंतर जेव्हा ते भारतात परतले तेव्हा त्यांनी कोरोनाची टेस्ट केली होती. टेस्ट निगेटीव्ह आली, परंतु खबरदारी म्हणून सुरेश प्रभु यांनी स्वत:ला 14 दिवसांपर्यंत क्वारंटाईन मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ते आपल्या घरात क्वारंटाईन आहेत. यारदम्यान ते कुणाला भेटू शकणार नाहीत आणि कुणीही त्यांच्याजवळ जाणार नाही. एक वैद्यकीय पथक त्यांच्या घरी तैनात करण्यात आले आहे.

यापूर्वी मोदी सरकारमधील राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन कोरोना वायरसच्या वाढत्या प्रकोपामुळे घरात क्वारंटाईन झाले होते. त्यांच्या स्टाफने मंगळवारी ही माहिती दिली. त्यांच्या स्टाफने म्हटले की, मंत्री केरळमध्ये एका बैठकीसाठी गेले होते, जेथे त्यांचा कोविड-19 चा संसर्ग झालेल्या एका डॉक्टरशी संपर्क आला होता. खबरदारी म्हणून ते एकांतवासात आहेत.

14 दिवसांपर्यंत कुणालाही भेटणार नाहीत मुरलीधरन

राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या स्टाफने सांगितले की, कोरोना व्हायरसच्या संसर्गाची तपासणी केली असून रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. यानंतर मंत्र्यांनी स्वत:ला 14 दिवसांसाठी क्वारंटाईन केले आहे. यादरम्यान ते कुणालाही भेटणार नाहीत.