दिल्लीतील ‘महाराष्ट्र सदना’त ‘कोरोना’चा उद्रेक, 17 जण बाधित

पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असतानाच राजधानी दिल्लीतल्या नवीन महाराष्ट्र सदनात कोरोनाचा प्रकोप झाला आहे. तब्बल 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र सदनामध्ये निवासाला अनेक लोकसभा व राज्यसभेचे खासदार आहेत.

संसदेचं अधिवेशन सुरू असल्याने महाराष्ट्र सदनात लोकांची वर्दळ वाढली आहे. राज्यभरातून नेते आणि कार्यकर्ते महाराष्ट्र सदनात येत असतात. त्यामुळे संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. सदनातील 17 व्यक्तीचे अहवाल कोरोनाबाधित आल्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, राज्यात दिवसभरात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांमध्ये उच्चांकी 24 हजार 619 नवे रूग्ण आढळून आलेत. तर 389 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 11 लाख 45 हजार 840 एवढी झाली आहे. दिवसभरात 19 हजार 522 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. रिकव्हरी रेट हा 70.90 एवढा झाला आहे.