धक्कादायक ! ‘कोरोना’मुळे दृष्टीवरही परिणाम : तज्ज्ञांचे मत

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे वेगवेगळे परिणाम होत असल्याचे संशोधनावरुन दिसून आले आहे. संसर्गामुळे रक्त गोठल्यामुळे मेंदू, हृदय, हात-पाय, पोटानंतर आता दृष्टीपटलाच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आत्तापर्यंत कोरोनाबाधित 8 रुग्णांमध्ये डोळ्याच्या पडद्यावरील रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या (थ्रोम्बोसिस) झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे कोरोनानंतर पुनर्तपासण्या होणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

कोरोनाचे काही दुष्परिणाम हळूहळू शरीरावर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हाता-पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या झाल्यास तो भाग सडतो हृदयाच्या रक्तवाहिनीत रक्ताच्या गुठळ्या झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो. यासह पोटामधील रक्तवाहिन्यांवर परिणाम झाल्याच्या घटनांची नोंद आहे. मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्येही रक्ताच्या गुठळ्या झाल्याने आतापर्यंत 28 जणांना अर्धागवायूचा झटका आला. आता डोळ्यांच्या पडद्यावरील रक्तवाहिन्यांवर परिणाम झाल्याचे तपासण्यांतून निदर्शनास आले.

कोरोनामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरू झाल्यास शरीराच्या कोणत्याही भागातील रक्तवाहिनींवर याचे दुष्परिणाम दिसतात, असे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले आहे. रक्त गोठण्याचे निदान करण्यासाठी ‘डी-डायमर’ चाचणी अचूक आहे. कारण कोरोनाबाधित बहुतांश रुग्णांमध्ये ही चाचणी केल्यास कमी-अधिक प्रमाणात रक्त गोठल्याचे दाखवित आहे. त्यामुळे सरसकट सर्वच रुग्णांना औषधे सुरू करणे शारीरिकदृष्टया योग्य नसल्याचे डॉ. राहुल पंडित यांनी स्पष्ट केले.