Coronavirus : फक्त 11 रूपयांमध्ये बचावाची ‘हमी’ देणारा ‘कोरोना बाबा’ जेलमध्ये

लखनऊ : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून नागरिकांमध्ये याची दहशत निर्माण झाली आहे. याचा गैरफायदा अनेक ढोंगी लोक घेत असून त्यामुळे नागरिकांची फसवणूक होत आहे. तर काही लोकांकडून कोरोना व्हायरसबाबत अफवा पसरवल्या जात आहे. अशाच एका ‘कोरोना बाबा’च्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून या बाबाची रवानगी आता तुरुंगात करण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर काही लोक फायदा घेऊन लोकांची फसवणूक करू लागले आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या वजीरगंज पोलिसांनी सीएमओच्या तक्रारीवरून अमहद सिद्दीकी नावाच्या ढोंगी तांत्रिकाला अटक केली आहे. अहमद याने त्याच्या दुकानाबाहेर एक फलक लावला होता, ज्यामध्ये असं स्पष्टपणे लिहिलं होतं की, जे लोक मास्क विकत घेऊ शकत नाही, त्यांनी त्यांच्याकडील सिद्ध केललं तावीज विकत घ्याव. हा ढोंगी बाबा हे तावीज केवळ 11 रुपयांना विकत होता. तसेच हे तावीज बांधल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नसल्याचा दावा त्याने केला होता.

सीएमओने पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर वजीरगंज पोलिसांनी अहमद सिद्दीकी याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक केली. लखनऊचे पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त विकास चंद्र त्रिपाठी यांनी सांगितले, जवाहर नगर येथील रहिवासी अहमद सिद्दीकी याच्याबद्दल सीएमओकडून तक्रार आली होती. त्याला फसवणुकीच्या कलमान्वये अटक केली आहे. सीएमओने दावा केला आहे की, आरोपी स्वत:ला कोरोना बाबा म्हणत तावीज विकत होता.