Corona Vaccination : राज्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबणार?; राजेश टोपे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्ययंत्रणांवर याचा मोठा ताण येत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार, लसीकरणाची व्याप्तीही वाढवण्यात आली आहे. पण आता 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला ब्रेक लागणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

राजेश टोपे यांनी सांगितले, की राज्यातील 45 वर्षांवरील व्यक्तींना लसींचा दुसरा डोस देणे महत्त्वाचे आहे. सध्या 5 लाख लोकांना लसीचा दुसरा डोस द्यायचा आहे. केंद्राकडून लसीचा साठा उपलब्ध होत नसल्याने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. केंद्र सरकारकडून कोविशिल्डचे 16 लाख डोस येणे बाकी आहे. मात्र, लस उपलब्थ होत नसल्याने राज्य सरकारने खरेदी केलेले 3 लाख डोस आता 45 वर्षांवरील व्यक्तींना दिले जाणार आहेत. त्यामुळे राज्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबेल, असे संकेत राजेश टोपे यांनी दिले आहे. सध्या ज्यांना लसीचा पहिला डोस दिला आहे. त्यांना दुसरा डोस वेळेत देण्याची गरज आहे नाहीतर पहिला डोस वाया जाऊ शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली आहे. उद्याच्या बैठकीत निर्णय होईल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

तसेच राज्यात दिवसाला 2 लाखांपर्यंत चाचण्या केल्या जात आहेत. आत्तापर्यंत 1 कोटी 84 लाख नागरिकांचे लसीकरण झाले. आता 45 वयोगटापेक्षा अधिकसाठी फक्त 35 हजार लसींचे डोस शिल्लक आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून 18 ते 44 वयोगटासाठी खरेदी केलेले 3 लाख डोस 45 वर्षांवरील नागरिकांना देण्यात येणार आहेत.