Coronavirus : जगातील 26 % नवीन प्रकरणं भारतामधून, बनलंय नवीन ‘कोरोना’ सेंटर ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोनाचा आलेख झपाट्याने वाढत आहे. एकूण रुग्णांची संख्या ३१ लाखांवर गेली आहे. भारत हा तिसरा देश आहे, जिथे ३० लाखाहून अधिक रुग्णांची पुष्टी झाली आहे. यापूर्वी अमेरिका आणि ब्राझीलमध्ये ३० लाखाहून जास्त प्रकरणे आढळली आहेत. विशेष म्हणजे गेल्या एका आठवड्यात भारतात जगातील २६ टक्के प्रकरणे आढळली आहेत.

वर्ल्डमीटरच्या माहितीनुसार, संपूर्ण जगात कोरोना रूग्णांची संख्या २ कोटी ३८ लाखांपेक्षा जास्त आहे, ज्यामध्ये ८ लाख १७ हजारांहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. आतापर्यंत १ कोटी ६३ लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत, तर सक्रिय रुग्णांची संख्या ६६ लाखाहून अधिक आहे.

२४ ऑगस्ट रोजी जगात २ लाख १३ हजार नवीन रुग्ण आढळले होते, तर त्याच दिवशी भारतात नवीन रूग्णांची संख्या ५९ हजाराहून अधिक होती. त्याचप्रमाणे २३ ऑगस्ट रोजी संपूर्ण जगात २ लाख १० हजार नवीन रुग्ण आढळले होते, तर भारतात नवीन रूग्णांची संख्या ६१ हजाराहून अधिक होती.

तसेच २२ ऑगस्ट रोजी संपूर्ण जगात २ लाख ६७ हजार प्रकरणे आढळली, तर एकट्या भारतातच ७० हजार नवीन प्रकरणे आढळली. २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण जगात २ लाख ५८ हजार प्रकरणे आढळली, तर एकट्या भारतातच ६९ हजार नवीन प्रकरणे आढळली. २० ऑगस्ट रोजी संपूर्ण जगात २.६७ लाख प्रकरणे आढळली, तर भारतात ६८ हजार नवीन प्रकरणे आढळली.

म्हणजेच संपूर्ण जगात येणाऱ्या चार प्रकरणांपैकी एक प्रकरण भारतात आढळत आहे. भारतातील एकूण रूग्णांची संख्या आता ३१ लाख ६७ हजारांवर गेली आहे, ज्यामध्ये ५८ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २४ लाखाहून अधिक लोक बरे झाले आहेत. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ७ लाखाहून अधिक आहे.