Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’ची धक्कादायक आकडेवारी समोर, आता ‘ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट’वर भर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्गित रुग्णांच्या संख्येत दररोज एक ते दीड हजारांची भर पडत असल्याने पुण्यातील रुग्णसंख्येने ५० हजारांचा टप्पा पार केला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या आता एकोवीस हजारांवर पोहचल्याने पुण्यात आता रुग्णांना स्वतंत्र बेड मिळणे सुद्धा अवघड झाले आहे.

पुणे जिल्ह्यात मंगळवारी २६१८ कोरोना संसर्गित रुग्णांची नोंद करण्यात आली. पुणे महानगरपालिका हद्दीत १२१३ जणांना या संसर्गाची लागण झाली असून, ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पिंपरी- चिंचवड महानगरपालिका परिसरात दिवसभरात विक्रमी ११८१ रुग्णांना याची बाधा झाली असून, १३ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे १७९२ लोकांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरात कोरोना संसर्गित रुग्णांची एकूण संख्येने ५० हजार तर संपूर्ण जिल्ह्यात ७५ हजारांचा टप्पा पार केला आहे. महाराष्ट्रात मुंबईनंतर ही सर्वात मोठी रुग्णसंख्या आहे.

पुण्यात ‘ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट’ वर भर

कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी यापुढे पुणे शहर आणि जिल्ह्यात संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशाखाली काम करेल. कन्टेन्मेंट परिसरात घरोघरी जाऊन अल्पवधी काळात तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे. रुग्णांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षित रित्या अलगीकरण, विलगीकरण केलं जाणार आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुभार्व रोखण्यासाठी जनजागृती करुन लोकसहभाग वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे.

यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, अधिकारी नियमित पत्रकार परिषद आयोजित करुन नागरिकांना संवाद साधणार आहेत. लोकप्रतिनिधी, नागरिकांना सोबत घेऊन कोरोना संसर्गाविरोधात सुरु असलेली लढाई एकत्र लढली जाईल आणि आम्ही पुणेकर कोरोना संसर्ग विरुद्ध ही लढाई नक्की जिंकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पुणे दौरा

पुण्यातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार राज्याच्याच नव्हे तर देशाच्या चिंतेचा विषय बनला आहे. राज्यातला प्रत्येक तिसरा कोरोना संसर्ग पॉझिटिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यातील आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्या गुरुवारी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी ९ वाजता मुंबईतून पुणे शहराकडे निघतील. त्यानंतर साधारपणे ११.३० वाजेच्या सुमारास ते पुण्यात दाखल होतील. पुण्यात आल्यानंतर पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग संदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत बैठक घेणार आहेत.