Mumbai : धारावी नव्हे तर ‘हा’ आहे कोरोनाचा नवा हॉटस्पॉट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबई मधील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावीमध्ये गेल्या वर्षी कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला होता. आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आहे. पण यावेळी कोरोनाने झोपडपट्टी परिसराऐवजी उच्चभ्रू परिसरात कोरोनाने शिरकाव केला आहे. यावेळी कोरोनाने धारावीऐवजी अंधेरीकडे मोर्चा वळवला आहे. या परिसरात बॉलिवूड स्टार्स राहतात याच भागात कोरोनाचे अनेक रुग्ण सापडले आहेत.

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशातील १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर तर मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे. मंगळवारच्या आकडेवारीनुसार मुंबईमध्ये ३५१२ नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यानंतर रुग्णांची संख्या ३,६९,४२६ इतकी झाली आहे. मुंबईतील अंधेरी पश्चिम भाग हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला आहे. मुंबई शहरातील २४ वॉर्ड्सपैकी या विभागात सर्वात जास्त कोरोना केसेस आढळून आले आहेत. सध्या अंधेरीत रोज २०० ते ३०० रुग्ण सापडत आहेत. सोमवारी ३०० रुग्णांची नोंद झाली. या ठिकाणी आठवड्यातील रुग्णवाढीचा दर हा ०.९७ आहे.

त्यामुळे प्रशासनाकडून लवकरच जुहू बीच बंद ठेवण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जुहू बीचवर क्लिनअप मार्शल्स तैनात करण्यात आले आहे. जे लोक मास्कशिवाय फिरताना दिसत आहेत त्यांना दंड आकारण्यात येत आहे. सोमवारपासून तिकडे अँटिजेन टेस्ट सुरु करण्यात आली आहे. तसेच त्या परिसरात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेचे सहआयुक्त माहिती विश्वास मोटे यांनी दिली आहे.

कोरोनाने आतापर्यंत ११६०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ३,२९,२३४ रुग्ण बरे झाले आहेत. तर २७,६७२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या शहरात कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे बीएमसीने खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यावर बंदी घातली आहे. एवढे करूनसुद्धा कोणी हे सण साजरे करताना दिसले तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारासुद्धा महापालिकेकडून देण्यात आला आहे.