पुण्यातील ‘सिरम’ला मोदी सरकारचा दणका ! ‘हा’ प्रस्ताव फेटाळला, देशवासियांना प्राधान्य देण्याची केंद्राची भूमिका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसने हाहाकर माजवला आहे. देशात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. देशात लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु आहे. काही राज्यांनी लस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याची तक्रार केंद्र सरकारकडे केली आहे. लसींच्या पुरवठ्यावरुन केंद्र सरकारला विरोधकांनी धारेवर धरले आहे. याच दरम्यान भारतात कोरोना विरोधी लस तयार करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा एक प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळून लावत सिरमला दणका दिला आहे. सिरमने यूकेला 50 लाख डोस देण्याचा प्रस्ताव केंद्रासमोर ठेवला होता.

कोविशिल्ड लसीचे 50 लाख डोस युकेला पाठवण्याचा सिरमचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला आहे. आंतरराष्ट्रीय दबाव तसंच वाटाघाटी करण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतरही केंद्र सरकारने सिरमची ही विनंती फेटाळून लावली आहे. सिरमकडून युकेला लस पुरवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, त्याआधारे ही विनंती करण्यात आली होती.

अनेक राज्यांकडून लसींचा पुरवठ कमी प्रमाणात होत असल्याची तक्रार करत केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. देशात तयार होणारी लस अगोदर देशवासीयांना दिली पाहिजे. तसेच देशातील प्रत्येक राज्याला पुरेसा साठा दिला पाहिजे. त्यानंतर लस निर्यात करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून सिरमला परवानगी नाकरण्यात आली आहे.

देशात 45 वर्षापूढील सर्वांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यानंतर केंद्राने 18 ते 44 वयोगटातील सर्वांना लस देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यांना त्यांच्या मागणीनुसार पुरवठा व्हावा यासाठी सिरमशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. देशात सध्या 18 ते 44 वयोगटातील लोकांना लस देण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात राज्यांकडून लसीची मागणी होत आहे.

कोविशिल्ड लसीचे हे 50 लाख लाख डोस आता 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी उपलब्ध आहेत. राज्यांना हे डोस मिळवण्यास सांगण्यात आले आहे. खासगी रुग्णालयांना देखील हे लसीचे डोस उपलब्ध होऊ शकतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सिरमशी संपर्क साधत लवकरात लवकर लसींचे डोस मिळवण्याची प्रक्रिया सुरु करण्यास सांगितले आहे.