मोहन भागवतांचं मोठं विधान, म्हणाले – ‘स्वतंत्र भारतात असं प्रथमच घडतं आहे’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – समाजासाठी समाजानेच काम करायला हवे. स्वातंत्र्याच्या लढ्यानंतर समाजातील सर्व लोक पुढे येऊन कोरोना संकटाचा सामना करत आहेत, असे प्रथमच घडते आहे. ज्याप्रमाणे भारतात संपूर्ण समाज समाजाच्या मदतीसाठी पुढे आला, असे चित्र या कोरोना संकटाच्या काळात जगात कुठेही दिसले नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ( RSS chief Mohan Bhagwat) यांनी व्यक्त केले.

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड 19 रिस्पॉन्स अर्थात पीपीसीआरने पुणे शहरात मार्च महिन्यापासून केलेल्या कार्याच्या ‘कॅटलायझिंग कोलेब्रेशन’चे या अहवालाचे प्रकाशन डॉ. भागवत यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले. त्यावेळी ते बोलत होते. करोनाच्या संकटामुळे आपला राष्ट्रीय आत्मविश्वास वाढला आहे. भारतीय समाज हा ‘वसुधेव कुटुंम्बकम्‌’ हा संस्कार जपणारा समाज आहे. ही गोष्ट या संकटाच्या निमित्ताने जगाला आता कळते आहे. करोनानंतर रोजगार, कौशल्य प्रशिक्षण शिक्षण, समुपदेशन ही आपल्या समोर असलेली आव्हाने आहेत. आगामी काळात त्यावर काम करणे आवश्यक आहे. पीपीसीआरने या क्षेत्रात देखील असेच काम पुढे सुरू ठेवावे, असे डॉ. भागवत म्हणाले.

संकटाचा सामना एकीने व नियोजपूर्वक केला आहे. या अनुभवाचा फायदा देशातील इतर महानगरांना व अन्य सामाजिक प्रश्नांच्या निरकरणासाठी होऊ शकतो. त्यासाठी पीपीसीआर सदैव तत्पर आहे, असे यावेळी पीपीसीआरचे प्रमुख समन्वयक व मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे एमसीसीआयएचे अध्यक्ष सुधीर मेहता म्हणाले. यावेळी ज्येष्ठ उद्योजक डॉ. अभय फिरोदिया, एमसीसीआयचे माजी अध्यक्ष प्रदीप भार्गव, डॉ. धनंजय केळकर, भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा, तुकाराम नाईक, मिलिंद कांबळे, अभिनेते गिरीष कुलकर्णी आदी उपस्थित होते.

पीपीसीआरचे मदतकार्य –
रुग्णालयांना पायाभूत सुविधा व संसाधनांची मदत, मास्कचे वितरण, फेसशिल्ड्स, पीपीई किट्स, ऑक्सिमिटर्स, रेशन किट्स, भोजन पाकिटे, गरजूंना जेवण, सहा लाख हायड्रोक्सीक्लोरोक्विन (एचसीक्यू) टॅब्लेट्स वितरण, एचएफएनओ, व्हेंटिलेटर्सची मदत, आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन, कोविड केअर सेंटर तयार करण्यात संपूर्ण मदत, आरोग्य सेवा व्यावसायिकांसाठी ई-प्रशिक्षण, बेडची उपलब्धतेची ताजी माहिती उपलब्ध व्हावी यासाठी रिअल-टाइम डॅशबोर्ड आणि त्यासंबंधातील पूर्वानुमानसाठी सॉफ्टवेअरचे विकसन, असे भरीव काम पीपीसीआरने करोनाकाळात केले.