कोरोना संकटात भारताला इस्लामिक देशांकडून मिळत आहे मोठी मदत

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेशी भारत आर-पारची लढाई लढत आहे. परंतु विक्राळ होत चाललेल्या कोरोना संकटात ऑक्सीजन, बेड, औषधे, टेस्ट किट आणि लसीची सुद्धा टंचाई दिसून येत आहे. ऑक्सीजन आणि औषधाची व्यवस्था रूग्णांच्या नातेवाईकांनाच करावी लागत आहे.

कोरोनाचा हाहाकार सुरू असताना जगातील अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. या देशांमध्ये अनेक इस्लामिक देशांचा समावेश आहे. ऑक्सीजनच्या टंचाईमुळे भारताने ऑक्सीजन मैत्री ऑपरेशन अंतर्गत ऑक्सीजन कंटेनर आणि ऑक्सीजन सिलेंडर मिळवण्यासाठी अनेक देशांशी संपर्क साधला आहे.

सौदी अरब
सौदी अरबने या कठिण काळात भारताला मोठी मदत केली आहे. सौदी अरबहून 80 मेट्रिक टन गॅस पाठवण्यात आला आहे. रियाद येथील भारतीय मिशनने ट्विट केले की, भारतीय दूतावासाला अति आवश्यक 80 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सीजन पाठवण्याच्या बाबतीत अदानी समूह आणि एमएस लिंडे सोबत भागीदारी करण्यावर गर्व आहे. आम्ही मनापासून सौदी अरबच्या आरोग्य मंत्रालयाचे आभारी आहोत.

संयुक्त अरब अमीरात
तसेच संयुक्त अरब अमीरात (यूएई) चे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी फोनवर बातचीत केली आणि म्हटले त्यांचा देश प्रत्येक स्तरावर कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी मदत करेल. भारतीय हवाई दलाचे सी-17 विमान 26 एप्रिलला ऑक्सीजन आणण्यासाठी दुबईला पोहचले होते. दुबईहून ऑक्सीजनचे सहा कंटेनर एयरलिफ्ट करून भारतात आणण्यात आले.

कुवैत
कुवैतने सुद्धा भारताला वैद्यकीय पुरवठ्यात मदत केली आहे. तर कतरचे अमीर तमीम बिन हमाद यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरील चर्चेत कोरोनाला तोंड देण्यासाठी भारताला शक्यत तेवढ्या मदतीचे आश्वासन दिले. कतर एयरवेजने घोषणा केली आहे की, भारतातील कोरोना संकट पाहता कोणतेही शुल्क न घेता दुसर्‍या देशांकडून मेडिकल सप्लाय पोहोचवणार आहे.

कुवैतकडून 185 मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सीजन मिळाला आहे. 1000 ऑक्सीजन सिलेंडर सुद्धा भारतात येणार आहेत. कुवैत भारतासाठी ऑक्सीजन कन्सट्रेटर सुद्धा पाठवणार आहे. संयुक्त अमीरातकडून मदतीचा पहिला साठा भारतात आला आहे.

बहरीन
बहरीन सुद्धा भारताच्या मदतीसाठी पुढे आला आहे. क्राऊन प्रिंस सलमान बिन हमद अल खलीफा, जे देशाचे पंतप्रधान सुद्धा आहेत, यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत कोरोना संकटात होरपळत असलेल्या भारताला मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. बहरीनने भारताला वैद्यकीय उपकरण आणि ऑक्सजीन पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तान
तणाव असूनही शेजारी देश पाकिस्तानने सुद्धा मदतीचा हात पुढे केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वैद्यकीय सप्लायचा प्रस्ताव दिला आहे. इम्रान खान यांचे म्हणणे आहे की, हे जागतिक आव्हान आहे आणि आपल्याला एकत्र येऊन तोंड दिले पाहिजे. भारतात लोक कोरोना संकटाचा सामना करत आहेत, मी त्यांच्या सोबत एकता प्रदर्शित करतो. पाकिस्तान सरकारच्या अधिकृत प्रस्तावासह तेथील एका ईदी फाऊंडेशनकडून सुद्धा मदतीसाठी प्रस्ताव आला आहे.