मुंबईत ‘कोरोना’चा वेग प्रचंड मंदावला पण सावधान पावसामुळं पुन्हा वाढू शकतो धोका

पोलीसनामा ऑनलाइन – भारतातील मुंबई, दिल्ली, अहमदाबाद या शहरांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला होता. काहीही तज्ज्ञांनी तर येथे सामूहिक संसर्ग झाल्याबद्दल शंका देखील उपस्थित केली होती. मात्र, अलीकडच्या काही काळात येथील रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे. पण याचा अर्थ कोरोना संसर्गाचा धोका टळला असा नाही, पावसामुळे हा धोका पुन्हा वाढू शकतो, अशी शक्यता दिल्लीतील एम्सच्या संचालकांनी व्यक्त केली आहे.

दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं की, “भारतातील वेगवेगळ्या कालावधीत कोरोना संसर्ग सर्वोच्च बिंदू गाठेल. सध्या दिल्लीत अशी परिस्थिती आहे. जिथे कोरोना संसर्ग आलेखाची वक्ररेशा समांतर होऊ लागली आहे. तसेच मुंबई, अहमदाबाद आणि दक्षिणेकडील काही भागात कोरोना संसर्गचा आलेख कमी होत आहे. या ठिकाणी कोरोना संसर्गाचे प्रमाण सर्वोच्च टोकावरती पोहचून आता ते परत कमी होत आहे. मात्र, रुग्ण कमी झाले असले तरी आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे.”

पुढं बोलता ते म्हणाले, भारतातील अनेक भागात जिथे कोरोना संसर्गाची प्रकरणे कमी झाली, त्या ठिकाणच्या लोकांना वाटलं आता आपल्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. म्हणून आपण सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणं हे सर्व थांबवू शकतो. पण यामुळे कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा वाढला असून, सावध राहायला हवं. तसेच कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सध्या जरी कमी दिसत असेल तरी उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात आणि हिवाळ्यात कोरोना संसर्गाचा धोका अधिक असेल, अशी चिंता डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केली.

डॉ. गुलेरिया यांनी म्हटलं की, “कोरोनाचा संसर्ग सामान्य वातावरणात दीर्घकाळासाठी राहतो आहे. उन्हाळ्यापेक्षा तो पावसाळ्यात आर्द्रतेमुळे जास्त काळ तग धरण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिमेकडे हिवाळ्यात कोरोना संसर्गाची दुसरी लहर येईल, अशी चिंता आहे. इन्फ्लूएंझा फ्लू भारतात पावसाळ्यात आणि हिवाळ्यात वाढतो. १९८० मध्ये इन्फ्लूएंझा व्हायरसची हिवाळ्यात दुसरी लाट आली होती आणि त्यामुळे मृत्यूही जास्त झाले होते. मात्र कोरोनाचा संसर्ग वेगळा आहे. तो पावसाळ्यात आणि हिवाळ्यात कसा असेल हे स्पष्टपणे सांगू शकत नाही.”

“मात्र तरी या कालावधीत सर्वानी खबरदारी घ्यायला हवी. कोरोना संसर्गापासून बचावासाठी आपण ज्या उपाययोजना करत आहोत त्या कायम ठेवायला हव्यात”, असा सल्ला डॉ. गुलेरिया यांनी दिला आहे