कोरोनाबाधिताच्या मृतदेहाला स्पर्श केल्यास संसर्ग होतो का? तर तज्ज्ञ म्हणतात…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. तर यामध्ये मृतांचे प्रमाणही अधिक आहे. एखाद्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास कोणी पुढे येत अंत्यविधी करण्यासही धजावत नाही. मनामध्ये भीती निर्माण झालेली असते. पण आता कोरोनाबाधिताच्या मृतदेहाला स्पर्श केल्यास संसर्ग होतो का? याची माहिती काही तज्ज्ञांनी दिली आहे.

एम्समध्ये कार्यरत असलेले डॉ. प्रवीण गुप्ता यांनी कोविडशी संबंधित अनेक प्रश्नांवर इंडिया टुडेच्या कोविड हेल्पलाईनवर उत्तरे दिली आहेत. याच चर्चेदरम्यान एक प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यामध्ये ज्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. त्यांच्या मृतदेहाला स्पर्श केल्याने कोरोना होतो का? त्यावर डॉ. गुप्ता म्हणाले, ‘जेव्हा एखाद्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू होतो. तेव्हा त्या व्यक्तीचा मृतदेह चांगल्याप्रकारे गुंडाळला जातो. त्यामुळे मृतदेहातून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते. कोरोना हवेतून पसरतो. मात्र, मृतदेह श्वास घेत नाही किंवा खोकला किंवा शिकणे असा प्रकार होत नाही. मृतदेहामुळे कोरोना होत नाही. पण तुम्ही गुंडाळलेल्या मृतदेहाला स्पर्श केल्यास हात चांगले धुणे विसरू नका. सर्वप्रकारच्या कोविड नियमावलीचे पालन करा’, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरस हा नव्या प्रकारचा आजार आहे. त्याबाबतच्या समज-गैरसमजातून अनेक लोकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. मात्र, त्यामध्येच मृत्यू झाला तर मोठी भीती निर्माण होते. त्यावेळी काय करावे काय नको, असेच होत असते. कोरोनाची लागण आपल्यालाही होईल. या भीतीपोटी लोक पुढे येत नाहीत. पण आता काही तज्ज्ञांनी याबाबत माहिती दिली आहे.