धक्कादायक ! ‘कोरोना’मुळे राज्यात 36 डॉक्टरांचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यभरात कोरोनाचा हैदोस सुरुच आहे. असे असतानाही रात्रंदिवस काम करणार्‍या डॉक्टरांनाही कोरोनामुळे जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करताना संसर्ग झाल्याने आतापर्यंत राज्यातील 36 डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यापैकी 33 टक्के डॉक्टर मुंबईतील आहेत.

कोरोना कालावधीत कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या डॉक्टरांची नोंद सरकारने ठेवलेली नाही, असा खेद व्यक्त करत डॉक्टरांच्या मृत्यूची आकडेवारी इंडियन मेडिकल असोसिएशनने जाहीर केली आहे. या डॉक्टरांना शहिदाचा सन्मान देण्यात यावा, अशी मागणी ‘आयएमए’ने केली आहे.‘आयएमए’च्या आकडेवारीनुसार, राज्यात सर्वाधिक म्हणजे 12 डॉक्टरांचा मृत्यू मुंबईत झाला आहे. या खालोखाल ठाणे, भिवंडी, कल्याण या भागांत आठ डॉक्टरांच्या मृत्यूची नोंद आहे. मृतांमध्ये 33 टक्के डॉक्टर 60 वर्षांवरील, तर 52 टक्के 50 ते 60 वयोगटांतील आहेत. 40 वर्षांखालील चार डॉक्टरांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशभरात कोरोनाने बळी घेतलेल्या डॉक्टरांची संख्या 382 वर पोहोचली आहे. सर्वाधिक डॉक्टरांच्या मृत्यूची (63) नोंद तमिळनाडूत झाली आहे. त्याखालोखाल आंध्र प्रदेश (42), उत्तर प्रदेश (42) आणि गुजरात (39) अशी संख्या आहे. त्यामुळे डॉक्टरही भीतीचे छायेखाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.