Pune : ‘कोरोना’मुळं मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबियांना या संस्थेनं केली प्रत्येकी 10 लाखांची मदत

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना (Corona) चे सर्वेक्षण करताना जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळातील शिक्षकांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटूंबीयांच्या मदतीला आता इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी धावून आली आहे. या पतसंस्थेच्या माध्यमातून या दिवंगत शिक्षकांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांचा धनादेश बुधवारी (३० सप्टेंबर) सुपूर्द करण्यात आला आहे.

कोरोनाचे सर्वेक्षण, आणि कोविड सेंटरवर कर्तव्य बजावत असताना पुणे जिल्हा परिषद शाळांतील तीन आणि माध्यमिक शाळांमधील दोन अशा पाच शिक्षकांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला होता. मृत्यू होऊन सुमारे महिन्याभराचा कालावधी लोटला गेला तरी सुद्धा, या शिक्षकांच्या कुटूंबीयांना सरकार किंवा जिल्हा परिषद प्रशासनाकडून काहीच आर्थिक मदत प्राप्त झाली नव्हती. इतकेच नाही तर या कुटूंबीयांचे सांत्वन करावे साधे एवढे सौजन्यही जिल्हा प्रशासनाने दाखवले नाही.

यातील एका शिक्षकाच्या पत्नीने आर्त हाक देत सेवेत असताना मृत्यू होऊनही प्रशासनाकडून आतापर्यंत कसलाच ना आर्थिक आधार मिळाला, ना कोणी सांत्वन केले. आता तुम्हीच सांगा, अशा परिस्थितीत आम्ही जगायचं कसे, असा सवाल उपस्थित केला होता. त्याच पार्श्वभूमीवर पतसंस्थेच्या वतीने सभापती संतोष वाघ, उपसभापती वसंत फलफले, माजी सभापती किरण म्हेत्रे, संभाजी काळे आदी संचालक मंडळाने संतोष खुटाळे यांच्या पत्नी सविता खुटाळे आणि सोपान कांबळे यांच्या पत्नी सुवर्णा कांबळे यांना त्यांच्या घरी जात प्रत्येकी १० लाख रुपयांचा धनादेश दिला.

त्यावेळी माजी सभापती सुनील शिंदे, विलास शिंदे, दत्तात्रेय ठोंबरे, संचालक आदिनाथ धायगुडे, बालाजी कलवले, तज्ज्ञ संचालक सुनील चव्हाण, सचिव संजय लोहार, शिक्षक समितीचे नेते मोहन भगत आदी उपस्थित होते.