कर्जाच्या हफ्त्यांसाठीचा बँकांनी दिलेला ‘दिलासा’ पडू शकतो ’महागात’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून ग्राहकांना तीन महिन्यांचा दिलासा देण्यात आला आहे. मात्र हा दिलासा ग्राहकांसाठी फायद्याचा ठरणारा नाही. आता जरी ईएमआयचे हफ्ते भरण्याचा दिलासा मिळाला असला तरी तीन महिन्यांचे व्याज या बँका नंतर वसूल करणार आहेत.

रिझर्व्ह बँकेने मागील आठवड्यात सर्व प्रकारच्या कर्जाच्या ईएमआयवर तीन महिन्यांसाठी दिलासा देण्याबाबत घोषणा केली. या काळात कुणी जर कर्जाचा हफ्ता नाही भरू शकलं तर त्या व्यक्तीला डिफॉल्टर मानलं जाणार नाही. याबाबतीत माहिती क्रेडिट प्रोफाइल तयार करणार्‍या कंपन्यांना देखील दिली जाणार नाही. मात्र आता कर्जदारांसमोर दुसरे आव्हान निर्माण झाले आहे. एकीकडे कोरोनामुळे लोकांच्या इन्कमवर परिणाम होणार आहे तर दुसरीकडे तीन महिने कर्जाचे हफ्ते नंतर भरताना या सर्वच महिन्याचे हफ्ते व्याजासह भरावे लागणार आहेत. भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना पाठवलेल्या सूचनेत सूट दिलेल्या काळातील सर्वच रकमेवर व्याज वाढत राहील. हे वाढलेले व्याज कर्जदारांकडून अतिरिक्त ईएमआयद्वारे वसूल करणार आहेत. दरम्यान या काळात जे ग्राहक आपल्या कर्जाचे हफ्ते भरत आहेत ते नियमितपणे आपले हफ्ते भरू शकतात.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॅनरा बँक, आयडीबीआय, एचडीएफसी, पंजाब नॅशनल आणि बँक ऑफ बडोदाने पुढील तीन महिने मासिक हप्ता न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पुढील तीन महिन्यांसाठी वाढवला जाईल असे नमूद केले आहे. महिन्याच्या पहिल्या तारखेपासून विविध प्रकारचे ईएमआय भरण्याचे दिवस सुरु होतात. 27 मार्चला रिझर्व बँकेने तीन महिने कर्जाचे हप्ते देण्याची सक्ती करु नका असे निर्देश दिले होते.