आळंदीत लग्न करायचे असेल तर ‘ही’ अट करा पूर्ण

आळंदी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे राज्यात विवाह इच्छुकांचे विवाह रखडले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे पर्यंत वाढवण्यात आला. असे असले तरी लॉकडाऊन 4.0 मध्ये शिथिलता मिळाल्याने रखडलेले विवाह सोहळे उरकण्यासाठी अनेकांनी आळंदी देवाचीकडे मोर्चे वळवले आहेत. गुपचुप दोन विवाहसोहळे या ठिकाणी पार पडले मात्र, याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी कठोर पावलं उचलली आणि गुन्हे दाखल केले. या प्रकरानंतर प्रशासनाने पुढील संभाव्य धोका ओळखून या ठिकाणी लग्न करण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. जर आळंदीत लग्न करायचे असेल तर या अटींची पूर्तता करावी लागणार आहे.

प्रशासनाने घातलेल्या अटीमुळे या ठिकाणच्या अर्थकरणाला खिळ बसली आहे. त्याच प्रमाणे प्रेम विवाह आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्यांची मात्र चांगलीच गोची झाली आहे. प्रेम विवाह आणि आंतरजातीय विवाह अन् कमी खर्च यामुळे आळंदीला मोठी पसंती दिली जाते. राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी आपल्या घरातील विवाह सोहळे पार पाडत असतात. तसेच पालखी आणि इतर सोहळे वगळता संत ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी देखील राज्याच्या कानाकोपऱ्यातून भावीक या ठिकाणी येत असतात. मात्र, लॉकडाऊन मुळे या ठिकाणी होणाऱ्या विवाह सोहळ्यांना बंदी घालण्यात आली.

तीन लॉकडाऊननंतर चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याची अफवा पसरल्यानंतर या ठिकाणी तीन विवाह झाले. हे प्रशासनाच्या निदर्शनास येताच त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि आळंदीमधील वर अथवा वधू असेल तरच, ते ही घराच्या अंगणात आणि 50 वऱ्हाडींच्या उपस्थित विवाह करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत. या निर्णयामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सोपे जाईल, तसेच संभाव्य धोका ओळखून प्रशासनाने विवाह सोहळ्याबाबत हा निर्णय घेतल्याची माहिती आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली.