Coronavirus : ‘कोरोना’मुळं UP, बिहार, MP सह अर्धा भारत ‘बंद’, शैक्षणिक संस्थांना लागलं ‘कुलूप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. भारतालाही या व्हायरसने ग्रासले असून आतापर्यंत ८० हून जास्त प्रकरणांची नोंद झाली आहे. तर कर्नाटकमध्ये पहिला मृत्यू झाल्याने लोकांमध्ये भीती पसरली आहे. यांनतर विविध राज्यात युद्धपातळीवर या व्हायरसशी लढा देण्याची तयारी सुरू झाली आहे. राज्य सरकारांनी शाळा व महाविद्यालये बंद करण्यापासून सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई करण्यापर्यंत कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. यूपी, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, दिल्ली ही राज्ये आहेत ज्यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी निर्णय घेतले आहे.

दिल्ली :
दिल्लीतील केजरीवाल सरकारने कोरोनाला साथीचा आजार म्हणून घोषित केले आहे. यासह, खबरदारीचा उपाय म्हणून ३१ मार्चपर्यंत सरकारी व खासगी शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच दिल्लीतील प्रतिष्ठित दिल्ली विद्यापीठ, जेएनयू आणि आयआयटीमधील वर्गही घेतले जाणार नाहीत. तसेच सिनेमा गृह आणि खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रपती भवन बंद आहे.

कर्नाटक :
कर्नाटकमधील मॉल, थिएटर, नाईट क्लब, पब आणि जलतरण तलाव पुढील आठवड्यापर्यंत बंदी घालण्यात आली आहे. यावेळी, लग्न समारंभ आणि उन्हाळ्याच्या शिबिरास देखील परवानगी दिली जाणार नाही.

बिहार :
सीएम नितीशकुमार यांनी शुक्रवारी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत सर्व सरकारी व खासगी शाळा – महाविद्यालये व कोचिंग संस्था ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू राहतील. याशिवाय सर्व अंगणवाडी केंद्रे, चित्रपटगृहे बंद ठेवण्यात येणार आहेत.

मध्य प्रदेश :
मध्य प्रदेश सरकारने पुढील आदेश होईपर्यंत सर्व सरकारी आणि अशासकीय शाळा तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, पाचवी ते आठवीपर्यंतच्या वार्षिक परीक्षांची योजना आधीच्या नियोजित तारखेनुसार असेल. याशिवाय दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा घेण्यास कोणतेही बंधन असणार नाही.

corona

उत्तर प्रदेश :
उत्तर प्रदेशातील सरकारने अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत २२ मार्चपर्यंत शाळा-महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. २० मार्च रोजी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.

महाराष्ट्र :
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा साथीचा रोग जाहीर झाला आहे. जिम, चित्रपटगृह आणि शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, लोकांना गटांमध्ये एकत्र येण्याची परवानगी दिली जाणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर आणि ठाणे मधील जिम, सभागृह, जलतरण तलाव बंद करण्याची घोषणा केली आहे.

हरियाणा :
हरियाणातील पाच जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठे ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीला लागून सोनीपत, रोहतक, झज्जर, फरीदाबाद, गुरुग्राम जिल्ह्यातील सर्व सरकारी व खासगी शाळा ३१ मार्चपर्यंत बंद आहेत. पूर्वीप्रमाणेच राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू आहेत.

corona

ओडिशा :
मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत ओडिशामध्ये कोरोना विषाणूचा आपत्ती घोषित करत २०० कोटी रुपये जाहीर केले आहेत. त्याचबरोबर ३१ मार्चपर्यंत शैक्षणिक संस्था आणि सिनेमा घरे बंद ठेवण्यात आली आहेत.

जम्मू-काश्मीर :
जम्मू-काश्मीरमध्ये शाळा आणि महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत. याशिवाय सर्व खेळ आणि कोचिंगच्या उपक्रमांवरही बंदी घातली आहे. क्रीडा परिषदेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “जम्मू-काश्मीरमधील सर्व खेळ किंवा कोचिंग उपक्रम पुढील आदेश होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहेत जे १३ मार्चपासून लागू होतील”.

केरळ :
कोरोनाच्या संसर्गामुळे केरळमधील विधानसभा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहे. सभागृहाची कारवाई ८ एप्रिलपर्यंत चालणार होती. केरळमध्ये 17 प्रकरणे समोर आली आहेत.

छत्तीसगड :
छत्तीसगडमध्ये शाळा-महाविद्यालयांवर बंदी घालण्यात आली नाही, परंतु ३१ मार्चपर्यंत शहरी भागातील सर्व सार्वजनिक ग्रंथालये, जिम, जलतरण तलाव, उद्यान आणि अंगणवाडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सैनिक फक्त कर्तव्यासाठी प्रवास करतील :
कोविड -१९ चा वाढता प्रसार पाहता भारतीय सैन्यही कोणत्याही प्रकारचा धोका घेऊ इच्छित नाही. लष्कराने सध्या सर्व भरती मेळावे एका महिन्यासाठी थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त, सैन्याने कर्मचार्‍यांच्या अनावश्यक प्रवासास प्रतिबंध केला आहे. ते फक्त कर्तव्यावर प्रवास करण्यास सक्षम असतील. त्यांना शक्य तितके व्हिडिओ कॉन्फरन्स वापरण्यास सांगितले गेले आहे.