‘कोरोना’ व्हायरस ‘इम्पॅक्ट’ ! भारतातील ‘पॅरासिटामॉल’च्या किंमतीत कमालीची ‘वाढ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणावर फैलावला आहे. याचा परिणाम चीनमधील उद्योगांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. चीनमध्ये औषध निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या असून कोरोना व्हायरसमुळे कंपन्या बंद आहेत. याचा परिणाम जागतिक औषध बाजार पेठेवर होताना दिसून येत आहे. एका वृत्तानुसार चीनमधुन होणारा औषधांचा पुरवठा खंडीत झाल्याने भारतात पॅरासिटामॉल औषधांच्या किंमतीत जवळपास 40 टक्के वाढ झाली आहे.

जायडस कॅडिला कंपनीचे चेअरमन पंकज पटेल यांनी सांगितले की, जंतु संसर्गाच्या उपचारासाठी वापरली जाणारी अ‍ॅंटीबायोटीक्स एजिथ्रोमाइसीनच्या किंमती 70 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चीनमधुन पुरवठा सुरळीत झाला नाही तर संपूर्ण फर्मा इंडस्ट्रीत इंग्रिडिएंट्सचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

अ‍ॅक्टिव फर्मास्युटिकल्स इंग्रिडिएंट्स (एपीआय) च्या आयतीसाठी भारत मोठ्या प्रमाणावर चीनवर अवलंबून आहे. कोणत्याही औषधाच्या निर्मितीसाठी एपीआय महत्वाचा घटक आहे. डायरेक्ट्रेट जनरल ऑफ कमर्शिअल इंटेलिजंस अ‍ॅण्ड स्टॅटिस्टिक्सनुसार 2016-17 मध्ये भारताने एपीआय गटात 19 हजार 635.25 कोटी रुपयांची आयात केली आहे.

यामध्ये चीनचा हिस्सा 66.69 टक्के होता तर 2017-18 दरम्यान भारताची आयात 21 हजार 481 कोटी रुपये होती. ज्यामध्ये चीनच्या हिस्सेदारीत वाढ होऊन ती 68.36 टक्के झाली होती. 2018-19 मध्ये एपीआय आणि ठोक प्रमाणातील औषधांच्या आयातीचे प्रमाण 25 हजार 552 कोटी रुपये झाले होते.