Coronavirus Impact : कोरोनामुळे पुण्यातील तुळशीबाग बंद, नायडु हॉस्पिटल परिसरात ‘संचार बंदी’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने आजपासून आणखी कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली असून गर्दी होणारी सर्व ठिकाणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील मध्य वस्तीतील लोकप्रिय तुळशीबाग येथील व्यापारी तसेच पथारीवाले यांना पुढील सुचना येईपर्यंत आपली दुकाने बंद ठेवण्याचा आदेश पोलिसांनी दिला आहे. तसेच नायडु हॉस्पिटल परिसरात गरज असलेल्यांशिवाय इतरांना जाण्यास मज्जाव केला आहे.

मध्य वस्तीतील तुळशीबाग हा पुण्यातील तसेच पुण्याला येणार्‍या महिलांसाठी खरेदीचे महत्वाचे ठिकाणी आहे. या ठिकाणी अरुंद गल्ल्या आणि छोटी छोटी दुकाने आहेत. तेथे नेहमीच गर्दी होत असते. गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी रविवारी रात्री येथील व्यापारी व पथारीवाले यांना पुढील सुचना येईपर्यंत दुकाने बंद ठेवावी व रस्त्यावर पथारी टाकू नयेत, असे आदेश दिले आहेत. मंडई भाजीपाला मार्केट हे जीवनावश्यक वस्तूंच्या यादी येत असल्याने मंडई मात्र सुरु राहणार आहे.

साधा सर्दी, खोकला झाला तरी नागरिक घाबरुन नायडु हॉस्पिटलमध्ये गर्दी करु लागले आहेत. आमचे सँपल घ्या व आम्हाला कोरोना नाही याचे सर्टिफिकीट द्या अशी मागणी हे नागरिक करु लागले आहेत. असे कोणाचे ही सँपल घेता येणार नाही, असे तेथील डॉक्टर लोकांना सांगत आहे. नायडु हे पुण्यात कोरोना बाधितांचे प्रमुख हॉस्पिटल आहे. तेथे गर्दी झाल्यास त्याचा फैलाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नायडु हॉस्पिटल परिसरात अन्य लोकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहरातील सर्व बागा, उद्याने, शनिवारवाड्यासारखी पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली.