Coronavirus Impact : राज्यसभेची निवडणूक पुन्हा लांबणीवर, लवकरच नव्या तारखांची घोषणा

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा राज्यसभा निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. लवकरच नवीन तारखांची घोषणा केली जाईल. यापूर्वी राज्यसभा निवडणूक याच कारणामुळे पुढे ढकलण्यात आली होती. राज्यसभेत रिक्त असलेल्या 55 जागांवर निवडणूक होणार होती. मात्र, 37 जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या संकटामुळे यापूर्वी या निवडणूका लांबवणीवर टाकण्यात आल्या होत्या. निवडणूक आयोगने 24 मार्चला निवडणूका रद्द करताना सांगितले होते की, लवकरच निवडणुकांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात येतील.

यापूर्वी 25 फेब्रुवारी रोजी आयोगाने 17 राज्यातील राज्यसभेच्या 55 जागांसाठी 26 मार्च रोजी निवडणुका घेण्याची घोषणा केली होती. 18 मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. यानंतर 10 राज्यातील 37 जागांवर एक-एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या जागांवरील उमेदवार बिनविरोध घोषित करण्यात आले.

37 जागा बिनविरोध झाल्यानंतर 18 जागा मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, झारखंड, आंध्र प्रदेश, मणिपूर आणि मेघालयातील आहेत. सर्व राज्यांमध्ये लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत निवडणुका घेणे शक्य नसल्याने निवडणूक आयोगाने 18 जागांसाठी होणारी निवडणूक पुढे ढकलली आहे. नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.