Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 24 तासात ‘विक्रमी’ 187 नवे पॉझिटिव्ह, 2 जणांचा मृत्यू

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या तीन हजाराच्या जवळ पोहचली आहे. सोमवारी कोरोना बाधित रुग्ण संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. सोमवारी 187 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये भाजपचे आमदार आणि त्यांची पत्नी तसेच एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे. कोरोनाचे रुग्ण आढळून लागल्यापासून एका दिवसात 187 रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आज शहरामध्ये 187 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आल्याने शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2909 इतकी झाली आहे. आज दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज दिवसभरात 77 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 2909 रुग्णांपैकी 1717 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 45 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याव्यवतिरिक्त शहरामध्ये उपचार घेत असलेले पुणे आणि आसपासच्या परिसरातील 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 169 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पिंपरी चिंवड आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज शहरामध्ये 88 महिलांसह एकूण 187 रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये पुणे, बोपोडी, खडकी बाजार, सासवड, चाकण, देहूरोड, अमरावती, बीड, मुंबई आणि सुपे येथील रहिवासी असलेल्या 5 महिलांसह 12 जणांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त पिंपरी चिंचवड हद्दी बाहेरील 69 रुग्णांवर शहरामध्ये उपचार सुरु आहेत. आज भोसरी येथील खंडोबा माळ येथील 51 वर्षीय व्यक्तीचा आणि लातूर येथील 36 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या शहरामध्ये 1143 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.