चीनमध्ये पुन्हा ‘कोरोना’चं थैमान, Lockdown मध्ये वाढ; राजकीय कार्यक्रम रद्द

बिजिंग : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) उद्रेकाच केंद्र असलेल्या चीनमध्ये (China) कोरोनाने पुन्हा एकदा डोक वर काढले असून दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे. यामुळे लॉकडाऊन वाढवला आहे. तसेच बिजिंगमधील सर्व राजकीय परिषद रद्द केले आहेत. गुआन शहरातील नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सात दिवसांसाठी प्रशासनाकडून हे आदेश जारी केले असून वुहान प्रांतातही अनेक कडक निर्बंध लादले आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांचा एक चमू गुरुवारी चीनमध्ये दाखल होणार आहे. कोरोनाच्या उगमाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ वुहानमध्ये संशोधन करणार आहेत.

चीनच्या वुहान प्रांतात गेल्या वर्षी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर संपूर्ण जग आज या विषाणूचा सामना करत आहे. हुबेई येथे मंगळवारी 40 नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याची माहिती तेथील आरोग्य विभागाने दिली आहे. हुबेई येथे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात होणारी पीपल्स काँग्रेस आणि सल्लागार समितीची परिषद देखील रद्द केली आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एका लग्नसोहळ्यानंतर उपस्थित असलेल्या 300 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर बिजिंगमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचाही रुग्ण आढळला आहे. चीनने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 87, 551 इतकी झाली आहे. तर 4634 जणांचा मृत्यू झाला आहे. वाढीच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आता नागरिकांच्या प्रवासावर निर्बंध घातले आहेत. तसेच शाळा देखील बंद केल्या आहेत.