Coronavirus : देशात ‘कोरोना’चा रिकव्हरी रेट 47.99%, 24 तासात बरे झाले 3,804 रूग्ण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   मागच्या चोवीस तासात देशात कोरोनाचे 3,804 रूग्ण बरे झाले आहेत. यासोबतच कोरोनाशी आयुष्याची लढाई जिंकलेल्या लोकांची एकुण संख्या 1,04,107 झाली आहे. भारतात कोरोना रूग्णांचा रिकव्हरी रेट सुद्धा वाढला आहे. गुरुवारी भारताचा रिकव्हरी रेट 47.99% होता. भारतात सध्या कोरोनाच्या 1,06,637 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. ज्यांच्यावर देशाच्या विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

आयसीएमआरने बाधित व्यक्तींमध्ये कोरोना व्हायरसचा शोध घेण्यासाठी चाचणीची क्षमात पुन्हा एकदा वाढवली आहे. आता देशात सरकारी लॅबची संख्या वाढून 498 करण्यात आली आहे. मागच्या चोवीस तासात कोरोना टेस्ट करणार्‍या प्रायव्हेट लॅब वाढून 212 झाल्या आहेत. माहितीनुसार मागच्या 24 तासात 1,39,485 सॅम्पलची चाचणी करण्यात आली आहे. अशाप्रकारे आतापर्यंत तपासण्यात आलेल्या सॅम्पलची एकुण संख्या 42,42,718 झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाने कोविड-19 महामारीमध्ये सुरक्षित ईएनटी प्रॅक्टिसबाबत नवे दिशा-निर्देश जारी केले आहेत. यासंबंधीची माहिती मंत्रालयाच्या वेबसाइटवर पाहिता येईल.

देशात कोरोना संसर्गाचा वेग सुद्धा वाढत चालला आहे. कोरोनाची प्रकरणे 2.16 लाखांच्या पुढे गेली आहेत, परंतु व्हायरसचा सर्वात जास्त कहर मुंबई, अहमदाबाद आणि दिल्लीत सुरू आहे. महाराष्ट्रात मागील 24 तासात 122 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये सुद्धा एका दिवसात 1500पेक्षा जास्त नवीन रूग्ण समोर आले आहेत. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 6 हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.