भारताच्या आणखी एका कंपनीनं केली ‘कोरोना लस’ बनविण्याची घोषणा, शेअर्समध्ये 20 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाचा सामना करण्यासाठी लस तयार करण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू झाला आहे. भारतातील सीरम इन्स्टिट्यूटनंतर आता हेस्टर बायोसायन्सनेही कोरोना लस बनविण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या या घोषणेनंतर बुधवारी त्याचे समभाग 20 टक्क्यांनी वधारले. अहमदाबाद येथील औषध निर्माता कंपनी हेस्टर बायोसायन्सने बुधवारी सांगितले की ते भारतीय तंत्रज्ञान संस्था गुवाहाटी (IITG) च्या संयुक्त विद्यमाने कोविड -19 ची लस विकसित करतील.

उल्लेखनीय आहे की यापूर्वी पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने असा दावा केला होता की ते सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत कोरोना लस तयार करतील आणि तिची किंमत सुमारे 1000 रुपये राहील. हेस्टरने जाहीर केले की त्याने 15 एप्रिल 2020 रोजी आयआयटीबरोबर करार केला आहे. कंपनीने म्हटले आहे की ही लस रीकोम्बिनेंट एव्हियन पॅरामीक्झोव्हायरस वेक्टर प्लॅटफॉर्मवर आधारित असेल.

कंपनीने काय म्हटले

एका वृत्तसंस्थेनुसार, हेस्टर बायोसायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एमडी आर गांधी म्हणाले, ‘आयआयटी गुवाहाटी आणि हेस्टर हे दोघेही मिळून कोविड-19 च्या निर्मूलनासाठी एक लस विकसित करण्यासाठी आणि लस बनवण्यासाठी एकमेकांना सहकार्य करतील.

शेअर्स वाढले

या घोषणेनंतर बुधवारी हेस्टर बायोसायन्सेसचे शेअर्स शेअर बाजारामध्ये सुमारे 20 टक्क्यांनी वधारले. बीएसईमध्ये त्याचे समभाग 1,366 रुपयांवर बंद झाले. अहमदाबादस्थित या औषधी कंपनीचे शेअर्स एका महिन्यात जवळपास 35 टक्क्यांनी वाढले आहेत.

कोणत्या प्रकारची असेल लस

विधानानुसार, रीकोम्बिनेंट एव्हियन पॅरामीक्झोव्हायरस -1 चा वापर ‘सार्स-सीओव्ही -2’ चे रोगप्रतिकारक प्रथिने म्हणून केला जाईल. नंतर त्याचा उपयोग पुढील अभ्यासासाठी केला जाऊ शकतो. या लसीच्या संभाव्यतेबद्दल, आयआयटी गुवाहाटीच्या जीवशास्त्र आणि जैव तंत्रज्ञान विभागातील सहयोगी प्राध्यापक सचिन कुमार म्हणाले की, यावर काही बोलणे सध्यातरी घाईचे ठरू शकते. ते संशोधन पथकाचे प्रमुख असतील.

ही कंपनी देखील बनवत आहे लस

हे लक्षात घेण्यासारखे आहे की यापूर्वी, भारतातील कोरोना लस तयार करण्यात गुंतलेल्या पुणे येथील सीरम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला यांनी सांगितले होते की जर चाचणी यशस्वी झाली तर ही लस यावर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत येऊ शकते आणि 1000 रुपयांना उपलब्ध होऊ शकते. एका नियतकालिकेस दिलेल्या विशेष मुलाखतीत पूनावाला म्हणाले की कोरोना लसीची आगाऊ चाचणी होण्यापूर्वी आपण ती जोखीम घेऊ आणि ते तयार करण्याचा प्रयत्न करू. तसेच ते म्हणाले की, त्याचे उत्पादन पुढील महिन्याच्या अखेरीस सुरू होऊ शकेल आणि जर चाचणी यशस्वी झाली तर सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत ते बाजारात उपलब्ध करुन देण्यात येईल.