‘कोरोना’चा कांद्याला फटका ! 7 रूपये किलो दराने विकण्याची शेतकर्‍यांवर वेळ

लासलगाव  : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोनाच्या प्रार्दुभावाचा फटका अजूनही जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या कांद्याला बसत आहे. यंदा कांद्याचे उच्चांकी उत्पादन झाले त्यात कोरोनाचा दणका यामुळे कांद्याला मोठा फटका बसला आहे. येथील मुख्य बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी 700 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे तर मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे मागील वर्षी २३ जुलै २०१९ रोजी उन्हाळ कांद्याला सरासरी ११५१ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता आणि आज २३ जुलै २०२० रोजी ७०० रुपये दराने कांदा विक्री करण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. कोरोनामुळे शेतात पिकविलेल्या मालाला बाजारपेठ राहिली नाही. खरीप हंगामाची पेरणी सुद्धा कर्जातून केली. चाळीत साठवलेल्या कांद्याला बाजारभाव मिळेल या आशेपोटी कांदा साठवला. सध्या फक्त पाच ते सात रुपये भाव मिळत आहे. मात्र, चाळीतून दुर्गंधी येऊन पाणी बाहेर पडू लागल्याने आता तरी कांद्याला योग्य बाजारभाव द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

१७ डिसेंबर २०१९ मध्ये कधी नव्हे तो ११ हजार १११ रुपये प्रतिक्विंटल उच्चांकी भाव मिळाला होता.परिणामी जिल्ह्यासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली. उत्पादनही मोठ्या प्रमाणात झाले. उन्हाळ्यात पाण्याचे व्यवस्थापन करून कांद्याचे पीक घेतले जाते. हा कांदा जुलै ते ऑगस्टपर्यंत कांदा कांदा चाळीत साठविला जातो. त्यानंतर या कांद्याला चांगला बाजारभाव मिळतो. हे धोरण आखून या भागातील शेतकरी कांदा पिकाचे नियोजन करताना दिसतात.

साधारणता जून आणि जुलै महिन्यानंतर कांद्याला मागणी वाढते. त्यामुळे कांद्याचे भाव वाढतात. परंतु कोरोनामुळे जुलै महिना संपत आला तरी बाजारात कांद्याची अपेक्षित भाववाढ झालेली नाही. त्यामुळे भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या उत्पादकाला अखेर साठवणूक केलेला कांदा बाजारात विक्रीसाठी बाहेर काढावा लागत आहे.

केंद्राने नाफेड मार्फत खरेदी केली,कांदा निर्यातीसाठी रेल्वे द्वारे पार्सल व्हेन उपलब्ध करून दिल्या मात्र भाव सुधारणा काही होतांना दिसत नाही.या करिता केंद्राने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरू करावी जेणे करून कांदा निर्यातीला चालना मिळेल अशी मागणी व्यापारी वर्गाकडून केली जात आहे.
आज येथील बाजार समितीच्या मुख्य आवारावर १३९३ वाहनांद्वारे २२ हजार २६५ क्विंटल आवक होऊन उन्हाळ कांद्याला किमान ३०१ रुपये कमाल ९६१ रुपये तर सरासरी ७०१ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.